देऊळगावमही पतसंस्थेत २.९३ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

लेखापरीक्षणात धक्कादायक खुलासा! सरोज महिला पतसंस्थेतील कोट्यवधींच्या आर्थिक गैरप्रकारावर गुन्हा दाखल

    दिनांक :23-May-2026
Total Views |
५५ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा
 
देऊळगाव राजा :
Deulgaon Mahi Credit Society देऊळगावमही येथील सरोज महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादितमध्ये तब्बल २ कोटी ९३ लाखांहून अधिक रकमेच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैधानिक लेखापरीक्षणादरम्यान उघड झालेल्या अनियमिततेच्या आधारे व्यवस्थापक, कर्मचारी, दैनंदिन ठेव एजंट, संचालक मंडळ सदस्य आणि कर्जदार सभासद अशा एकूण ५५ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
froud
 
या प्रकरणी विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ (सहकारी संस्था-साखर) सौ. ए. एम. व्यथ हारे (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम गुन्हा क्रमांक २३१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, सरोज महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, देऊळगावमही (नोंदणी क्रमांक ६८०) या संस्थेच्या १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षणात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आढळून आली. लेखापरीक्षण अहवालानुसार संस्थेतील व्यवस्थापक, कर्मचारी, दैनंदिन ठेव एजंट, संचालक मंडळ व काही कर्जदार सभासद यांच्या कथित गैरकारभारामुळे सुमारे रु. २,९३,०१,९३४ इतक्या रकमेचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
 
Deulgaon Mahi Credit Society  या संदर्भात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांच्या आदेशानंतर लेखापरीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर सादर झालेल्या अहवालांच्या आधारे सहायक निबंधक, सहकारी संस्था, देऊळगाव राजा यांनी संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी प्राधिकृत पत्र जारी केले होते. जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता यांच्या अभिप्रायानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
 
 
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३३८, ३३९, ३४०(१), ३४०(२), ३४४, ३१८(४) तसेच महाराष्ट्र सहकारी सोसायटी अधिनियम १९६० मधील कलम १४६ आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ मधील कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, प्रकरणाचा तपास पोलीस ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहारातील नेमकी जबाबदारी, निधीचा वापर आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.