पोलिस प्रशासन मात्र अनभिज्ञ
धामणगाव रेल्वे,
Dhamangaon Cattle Smuggling तालुक्यासह परिसरात सध्या गोवंश तस्करीचे प्रमाण वाढल्याचे चित्र समोर येत आहे. रात्रीच्या अंधारात तसेच ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक माध्यमे व नागरिकांकडून वारंवार लक्ष वेधले जात असतानाही पोलिस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य महामार्ग टाळून गावातील दुय्यम मार्गांद्वारे गोवंश वाहतूक केली जात असून, काही वाहनांमधून अमानुष पद्धतीने जनावरांची ने-आण केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात ही तस्करी सुरू असताना स्थानिक पोलिसांना याची माहिती नसावी, याबद्दल नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक नागरिक व गोरक्षक संघटनांनी पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Dhamangaon Cattle Smuggling याबाबत धामणगावच्या गोरक्षा दलाने धामणगाव रेल्वे येथे ठाणेदाराना निवेदन सादर केलेले आहे. सामान्य नागरिकांना व माध्यम प्रतिनिधींना तस्करीसाठी वापरले जाणारे मार्ग आणि वाहने यांची माहिती मिळू शकते, तर पोलिसांना ती का मिळत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांनी तर या प्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष अथवा मिलीभगतीची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. सतत वाढत असलेल्या गोवंश तस्करीमुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश करावा तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.