मंदिर विश्वस्तांची मागणी
यवतमाळ,
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेला Draft Maharashtra Devasthan Inam Abolition Act ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, 2026’ हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांच्या जमिनी हिरावून घेणारा आणि त्यांचे अस्तित्व धोक्यात आणणारा आहे. सरकार येत्या पावसाळी अधिवेशनात हा कायदा करण्याच्या तयारीत असल्यामुळे, या अन्यायी कायद्याविरोधात महाराष्ट्र मंदिर महासंघ तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विविध मंदिर विश्वस्तांनी देवस्थानच्या हिताचे रक्षण व्हावे, धार्मिक स्वातंत्र्य व मंदिराची आर्थिक स्वायत्तता अबाधित राहावी, यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यामार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले.
मंदिर विश्वस्तांच्या मते, या कायद्यामुळे मंदिरांचे पारंपरिक अधिकार हिरावून घेतले जाण्याची शक्यता असून मंदिरांच्या आर्थिक स्रोतांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक मंदिरांच्या व्यवस्थापनावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मंदिरांच्या जमिनी व त्यावरील अधिकार कायम ठेवण्यात यावेत, तसेच धार्मिक संस्थांच्या स्वायत्ततेचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी मंदिर विश्वस्तांनी शासनाने संबंधित कायद्याचा पुनर्विचार करून तो रद्द करावा, अशी मागणी शासनाकडे केली. तसेच राज्यातील सर्व मंदिरांच्या हितासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
Draft Maharashtra Devasthan Inam Abolition Act निवेदन देताना मंदिर महासंघ जिल्हा संयोजक भगवान डगवार, सहसंयोजक अभियंता प्रकाश जानकर, मनदेव देवस्थानचे अध्यक्ष अशोक खोडकुंबे, सचिव विजय मुंधडा, रेणुका माता चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव महादेव काचोरे, खटेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी, राधिका लेआऊट गणपती मंदिर उपाध्यक्ष सुरेश कुळकर्णी, सचिव बाळकृष्ण चावरकर, विश्वस्त संतुक जोशी, प्रगट जय हनुमान मंदिरचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र गटलेवार, सुभाषनगर दुर्गामंदिर सचिव अॅड. दीपक आखाडे, कोळंबी नृसिंह सरस्वती दत्तात्रय संस्थानचे सचिव चंद्रकांत पाम्पट्टीवार, कळंब चिंतामणी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. संतोष कुचनकर, बाभुळगाव बालाजी देवस्थानचे सचिव प्रेमचंद छत्तानी, अध्यक्ष रिखबचंद तातेड आणि मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक दत्तात्रय फोकमारे उपस्थित होते.