माहुरकुडा येथील शेतात आगीचे तांडव

    दिनांक :23-May-2026
Total Views |
- लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक : नुकसान भरपाईची मागणी

अर्जुनी मोरगाव, 
Fire in Mahurkuda fields तालुक्यातील माहुरकुडा येथील रुपचंद शहारे या शेतकर्‍याच्या शेतात लागलेल्या आगीत शेतातील लाकडे, सिंचनासाठी वापरण्यात येणारे महागडे पाईप, तसेच सोलर विद्युत पुरवठ्याच्या तारा असे लाखो रुपयांचे साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना 23 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. सदर आग अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व पिडीत शेतकर्‍याला नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
 
 
aag
 
Fire in Mahurkuda fields  प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता, संपूर्ण शेत परिसर जळालेल्या अवशेषांनी काळवंडलेला दिसून येत होता. शेतातील उभे गवत, बांधावरील झुडपे, लाकडांचे ढीग आणि सिंचनासाठी टाकण्यात आलेले पाईप आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सोलर पंपासाठी वापरण्यात येणार्‍या तारादेखील वितळून नष्ट झाल्याने शेतातील सिंचन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. उन्हाळ्याच्या काळात आधीच पाण्याच्या संकटाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांसाठी ही घटना आणखी गंभीर ठरत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, ही आग नैसर्गिक नसून कोणीतरी मुद्दाम लावल्याचा संशय आहे. वेळेवर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु आर्थिक फटका मात्र मोठा बसला आहे. पीडित शेतकरी रुपचंद शहारे यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच आग लावणार्‍या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वारंवार घडणार्‍या अशा घटनांवर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.