नीट विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवासासोबत पाणी-सत्तूचीही सोय!

    दिनांक :23-May-2026
Total Views |
पाटणा,
Free Travel for NEET Students नीट (NEET) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बिहार सरकारने मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. राज्यातील सर्व सरकारी बसमधून परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सोशल मीडियावर केली आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, नीट परीक्षेच्या दिवशी उमेदवारांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही प्रवास खर्च करावा लागणार नाही. बिहारमधील सर्व सरकारी बसमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येणार आहे. यासोबतच जिल्हा प्रशासन, धार्मिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना आवाहन करण्यात आले आहे की, बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि महत्त्वाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी आणि सत्तूची व्यवस्था करण्यात यावी.
 

NEET 
 
 
सरकारच्या या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण आणि दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरवर्षी परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास करावा लागतो आणि अशा वेळी आर्थिक तसेच प्रवासातील अडचणींचा सामना करावा लागतो. मोफत बससेवेच्या निर्णयामुळे हा भार कमी होणार आहे.यावर्षी वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि सत्तूची व्यवस्था करण्याचे आवाहनही महत्त्वाचे मानले जात आहे. राज्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही व्यवस्था मानवतावादी उपक्रम म्हणून पाहिली जात आहे. दरम्यान, नीट परीक्षा आधी ३ मे रोजी झाली होती, मात्र पेपरफुटीच्या आरोपांनंतर ती रद्द करण्यात आली होती. आता ही परीक्षा २१ जून रोजी दुपारी २ ते ५:१५ या वेळेत पुन्हा घेण्यात येणार आहे.