गोंदिया,
Gang of tendu leaf नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, वन विभागाच्या नियमानुसार अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान यांचे गाभा क्षेत्रापासून ३ कि.मी. च्या परिघात तेंदूपाने संकलन करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर काही संकलन केंद्र रद्द केले असून प्रतिबंधित क्षेत्रातून तेंदूपत्ता संकलन बंद करण्याचे निर्देश आहे. असे असताना तेंदूपत्ता ठेकेदारांकडून संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रद्द केलेल्या केंद्रासह गाभा क्षेत्राच्या ३ किमी परिघात संकलन केंद्र उभारून तेंदूपत्ता संकलन केले जात असल्याचा प्रकार तिरोडा व गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बफर झोनमध्ये पुढे आला आहे. असे असले तरी संबंधित वनक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभागाच्या टेंडर नोटीस २०२६, अन्वये प्रसिध्द निविदा सुचनेतील अटी व शर्तीनुसार अभयारण्य / राष्ट्रीय उद्यान यांचे गाभा क्षेत्रापासून ३ कि.मी. च्या परिघात तेंदूपाने संकलन केंद्र उघडण्यास मनाई आहे. याबाबत वन विभागाच्या वतीने यापूर्वीच संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयाला आवश्यक सुचना देण्यात आल्या आहे. Gang of tendu leaf असताना वनपरिक्षेत्र तिरोडा अंतर्गत घोटी मंगेझरी, बोदलकसा, आलेझरी, पिंडकेपार, बेरडीपार, भजेपार, मारेगाव, लोणारा व नवेझरी येथे तसेच वनपरिक्षेत्र गोरेगाव अंतर्गत जांभुळपाणी, रामाटोला, मलपुरी, हिरापूर, बोळूंदा व आसलपानी वनक्षेत्रात तेंदूपत्ता ठेकेदाराकडून अवैधरित्या तेंदुपाने संकलन केंद्र उभारुन तेंदूपत्ता संकलन केले जात आहे.
हा सर्व प्रकार संबंधित वनपरिक्षेत्रांतर्गत अधिकाऱ्यांच्या नजरेखालून सुरू असून यात मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. विशेष म्हणजे, काही वन्यप्रेमींनी तिरोडा व गोरेगाव वनपरिक्षेत्रातील प्रतिबंधित जंगलात अवैधरित्यातील तेंदूपत्ता संकलन होत असल्याची तक्रार उपवनसंरक्षक यांच्याकडे केली असता उपवनसंरक्षक यांनी ५ मे रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) तिरोडा व गोरेगाव यांना कार्यक्षेत्रांतर्गत अवैधरित्या सुरू असलेले तेंदूपाने संकलन केंद्र तात्काळ बंद करुन संबंधीतावर पीओआर जारी करुन नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले आहे. Gang of tendu leaf मात्र, दोन आठवडे लोटूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून या पत्राला केराची टोपली दाखवत कसलीच कारवाई करण्यात आली नाही. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावर कोणती कारवाई होते याकडे वन्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.
तेंदुपत्ता मजुरांचा जीव धोक्यात...
जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगामात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने घडत आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एका महिला मजुराचा मृत्यू तर काही मजूर गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. Gang of tendu leaf असे असताना तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून बफर क्षेत्रातून तेंदूपत्ता संकलन करून मजुरांचा जीव धोक्यात टाकला जात आहे.
बफर क्षेत्रात वाढ झाल्यानंतर गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत काही भाग वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत येत असून सद्या प्रादेशिक वन विभागाचे नियंत्रण आहे. असे प्रकार सुरू असल्यास संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना देऊन कारवाईचे निर्देश देण्यात येतील.
- विजय धांडे, सहाय्यक वनसंरक्षक, गोंदिया