हॉलिवूड अभिनेते ग्रिझ चॅपमन यांचे निधन

    दिनांक :23-May-2026
Total Views |
न्यूयॉर्क,
Griz Chapman Passes Away हॉलिवूड मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अमेरिकन अभिनेते ग्रिझ चॅपमन यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. ‘30 रॉक’ या लोकप्रिय सिटकॉममधील दमदार भूमिकेमुळे ग्रिझ चॅपमन यांना विशेष ओळख मिळाली होती. त्यांच्या सहज अभिनयशैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली होती. विनोदी आणि प्रभावी अभिनयामुळे त्यांचे लाखो चाहते होते.
 
 
Griz Chapman
 
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी ते दीर्घकाळापासून गंभीर मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होते. अनेक वर्षांपासून त्यांच्यावर डायलिसिसचे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रिझ चॅपमन यांनी अभिनयासोबतच डिजिटल माध्यमातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी ‘ग्रिझ क्रॉनिकल्झ’ नावाची यूट्यूब मालिका सुरू केली होती, ज्यामध्ये विनोदी लघुनाट्यांचे व्हिडिओ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात होते. याशिवाय त्यांनी 'ब्लू ब्लड्स', 'द गुड फाईट' व 'द ब्लॅकलिस्ट'यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले होते. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.