इस्लामाबाद,
Hamza Burhan's funeral पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके)मध्ये मोठी घटना घडली असून पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अर्जुनमंद गुलजार उर्फ हमजा बुरहान याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर दहशतवादी संघटनांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, हमजा बुरहान हा भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक मानला जात होता आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या संघटनांशी त्याचे निकट संबंध होते. त्याच्या अंत्यसंस्कारावेळी पीओके आणि पाकिस्तानमधील अनेक प्रमुख दहशतवादी संघटनांचे वरिष्ठ कमांडर मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती आहे.

या अंत्यविधीला हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन आणि अल-बद्र संघटनेचा वरिष्ठ कमांडर बख्त जमीन खान यांसारख्या दहशतवादी नेत्यांची उपस्थिती दिसून आली. अंत्यसंस्कारावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती आणि डझनभर सशस्त्र दहशतवादी तैनात करण्यात आले होते. मात्र तरीही उपस्थितांमध्ये अज्ञात हल्लेखोरांची भीती स्पष्टपणे जाणवत होती. अलीकडच्या काळात पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवाद्यांच्या लक्ष्यित हत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे दहशतवादी संघटनांच्या नेतृत्वामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, हमजा बुरहान हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयशी जवळीक असलेला दहशतवादी म्हणून ओळखला जात होता. तो मुझफ्फराबादमधील एका औद्योगिक केंद्रातून आपले नेटवर्क चालवत असल्याचेही समोर आले आहे. या ठिकाणाहून तो शस्त्रास्त्रांची तस्करी, अमली पदार्थांचा व्यापार आणि बनावट चलनाशी संबंधित कारवाया करत असल्याचा आरोप आहे. त्याच्या मृत्यूमुळे दहशतवादी संघटनांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून या घटनेमुळे परिसरातील तणाव आणखी वाढला आहे.