हंटाव्हायरसच्या संभाव्य धोक्याचा इशारा

    दिनांक :23-May-2026
Total Views |
मुंबई
Hantavirus मुंबई शहरात हंटाव्हायरस संसर्गाचा संभाव्य धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला असून, शहरातील वाढती उंदरांची संख्या, अस्वच्छता आणि दाट वस्ती यामुळे या संसर्गाबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मात्र भारतात हंटाव्हायरसचे रुग्ण अत्यंत दुर्मिळ असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करावे, असेही आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
 

Hantavirus  
हंटाव्हायरसचा मुख्य प्रसार उंदीर किंवा घुशींच्या लघवी, विष्ठा किंवा लाळेमधून होतो. ही दूषित सामग्री वाळल्यानंतर हवेत मिसळते आणि त्या सूक्ष्म कणांचा श्वासावाटे शरीरात प्रवेश झाल्यास संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे बंदिस्त, अस्वच्छ किंवा दीर्घकाळ हवेशीर नसलेल्या ठिकाणी साफसफाई करताना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईतील जुनी इमारती, गोदामे, बाजारपेठा, तसेच गर्दीच्या वसाहतींमध्ये उंदरांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो, असे निरीक्षण आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अद्याप यासंदर्भात कोणतेही अधिकृत मार्गदर्शन जारी करण्यात आले नसले तरी, व्यापक पातळीवर पेस्ट कंट्रोल मोहिम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
 
 
शहरातील गोदामे, Hantavirus  मॉल्स, रुग्णालय परिसर तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या ठिकाणी उंदरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उंदरांवर नियंत्रण ठेवणे आणि स्वच्छतेचे निकष अधिक काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.जे. जे. रुग्णालयातील फुफ्फुसरोग विभागाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले की, हंटाव्हायरसचा संसर्ग हा बहुतांश वेळा उंदरांच्या विष्ठा किंवा लघवीमधून हवेत पसरलेल्या कणांच्या श्वासावाटे होतो. त्यामुळे कोरडी झाडलोट किंवा व्हॅक्यूम क्लिनिंग टाळून ओल्या पद्धतीने स्वच्छता करणे अधिक सुरक्षित ठरते. तसेच उंदरांची बिळे बंद करणे आणि घरात त्यांचा प्रवेश रोखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉक्टरांच्या माहितीनुसार, या आजाराची सुरुवातीची लक्षणे सामान्य तापासारखीच असतात. ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि थकवा ही प्राथमिक लक्षणे असून पुढील टप्प्यात श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी गंभीर लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.हंटाव्हायरसचे रुग्ण प्रामुख्याने चीन, दक्षिण कोरिया, रशिया, स्वीडन, फिनलंड तसेच उत्तर व दक्षिण अमेरिकेतील काही भागांमध्ये आढळतात, अशी माहितीही तज्ज्ञांनी दिली आहे. भारतात मात्र हा संसर्ग अत्यंत दुर्मिळ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता राखणे, कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे, अन्नपदार्थ उघडे न ठेवणे आणि घरामध्ये उंदरांचा प्रवेश रोखणे या उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. योग्य खबरदारी घेतल्यास या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.