सहकार विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई;
आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त
अकोला :
Illegal Money-lending Case शहरात अवैध सावकारी करीत असल्याबाबतच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहकार खात्यातील अकोला व वाशीम जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने शनिवार,२३ रोजी ९ अर्जदारांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार १० ठिकाणी धाडी टाकून आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त केले आहे.जिल्हाधिकारी वर्षा मिना, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती गौतम वर्धन तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला-वाशिम गितेशचंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Illegal Money-lending Case सहकार विभागाकडे एकूण ९ अर्जदारांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे अकोला व वाशिम जिल्ह्यातील सहकार विभागातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, बँक अधिकारी तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या संयुक्त पथकांनी ही मोहीम राबविली. प्रशासनाकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची सखोल चौकशी व पडताळणी केली जाणार असून तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या कारवाईत सहकार विभागाचे ५० अधिकारी- कर्मचारी, ४० पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संस्था आणि गटसचिव कार्यालयातील असे एकूण १०० कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, अकोला व वाशिम जिल्ह्यातील सावकारीमुळे त्रस्त नागरिक व शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन तक्रारी दाखल कराव्यात,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,अकोला यांनी केले आहे. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवून त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल,असे प्रशासनाने नमूद केले आहे.
यांच्यावर केली कारवाई
धाड कारवाई दरम्यान विद्या विवेक गिरी यांच्या घर व कार्यालयासह रंजना मुंदे, संगीता भारती, मो. जाकीर मो. खलील, भूषण व्याघ्रांबरे, सहदेवराव शिंदे, सपना कडू तसेच शिला नाईक यांच्या घर व दुकानांची तपासणी करण्यात आली. या शोध मोहिमेत इसार पावत्या, कोरे धनादेश, कोरे बाँड, मूळ व झेरॉक्स खरेदीखत, डायऱ्या, करारनामे, गहाणखत, सातबारा उतारे यांसारखी विविध आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आली आहेत.
पथकात सहभागी अधिकारी- कर्मचारी
धाड कारवाईत पथक प्रमुख म्हणून ए. एम. भाकरे, आर. आर. विटणकर, पी. टी. सरकटे, एस. डी. नरवाडे, एस. एस. खान, व्ही. व्ही. सपकाळ, जे. एस. सहारे, आर. आर. घोडके, अनिल शास्त्री व एम. वाय. परतेकी यांनी काम पाहिले.तर फिरत्या पथकात उपनिबंधक सहकारी संस्था ज्योती मलिये आणि आशिष घाटोळे यांचा समावेश होता.