नवी दिल्ली,
IPL 2026: Who is the Best Captain आयपीएल २०२६ चा हंगाम सध्या रोमांचक वळणावर पोहोचला आहे. या हंगामात तीन संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी)चा समावेश असून, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील हा संघ दमदार कामगिरी करत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनीही प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता उरलेल्या चौथ्या स्थानासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. आज होणाऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. लखनौ सुपर जायंट्स आधीच स्पर्धेतून बाहेर पडला असून पंजाब किंग्ससाठी हा सामना ‘करो या मरो’ असा ठरणार आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक मोहम्मद कैफ यांनी आयपीएल २०२६ साठी सर्वोत्तम कर्णधार म्हणून शुभमन गिल याचे नाव घेतले आहे. त्यांच्या मते, गिलने या हंगामात केवळ नेतृत्वच नाही तर रणनीतीमुळेही आपली छाप पाडली आहे. कैफ यांनी सांगितले की, एक उत्कृष्ट कर्णधार तोच असतो जो आपल्या गोलंदाजांचा योग्य वापर करतो. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी या हंगामात १४ सामन्यांत तब्बल १०८ बळी घेतले असून, गिलने त्यांना कसोटी शैलीतील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचे मार्गदर्शन केले आहे.
कर्णधारपदासोबतच शुभमन गिलने फलंदाजीतही जबरदस्त कामगिरी केली आहे. तो सलामीवीर म्हणून संघाला मजबूत सुरुवात करून देत आहे. मागील दोन सामन्यांमध्ये त्याने सलग अर्धशतके झळकावली असून, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ८५ आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ६४ धावा केल्या आहेत. या हंगामात १३ डावांमध्ये गिलने १६१.६७ च्या स्ट्राईक रेटने ६१६ धावा केल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपल्या सहकारी साई सुदर्शन च्या जवळ दुसऱ्या स्थानावर आहे. साई सुदर्शनने १४ डावांमध्ये ६३८ धावा केल्या असून तो फक्त २२ धावांनी पुढे आहे. गिलने या हंगामात आतापर्यंत सहा अर्धशतके झळकावून आपली सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली आहे. त्यामुळे आयपीएल २०२६ मध्ये सर्वोत्तम कर्णधार म्हणून त्याचे नाव चर्चेत आले आहे.