वेध
अनिल उमाकांत फेकरीकर
Jalparni Sankat भारताने अमेरिकेतून सन 1955 मध्ये गव्हाची आयात केली होती. तेव्हा त्याच्यासोबत पार्थेनियम हिस्टेरोफोरस अर्थात गाजर गवत आले होते. भारतात त्याचे आगमन झाल्यावर ते खूपच वेगाने वाढले. म्हणूनच उपरोधिकपणे त्याला लोकांनी काँग्रेस गवत नाव ठेवले. आता गाजर गवत धोक्याचे ठरले असताना जलपर्णीचे संकट जलचर प्राण्यांच्या मृत्यूला आमंत्रण देत आहे. एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पत्नीने इंग्लंड येथून जलपर्णी वनस्पती 1890 च्या दशकात आणली होती. तिने सर्वप्रथम पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे त्याची बगिचात लागवड केली. त्यानंतर येथील पोषक वातावरण तिला भावले अन् आज जलपर्णी प्रत्येकाच्या मानगुटीवर बसली आहे. जलपर्णीचा विस्तार कसा झपाट्याने होतो, याचे प्रत्यक्ष उदाहरण पाहायचे झाल्यास नागपुरातील जनतेने अंबाझरी, कोराडी तलावाची पाहणी करावी. पुण्याची मुळा-मुठा नदी, ठाण्याची उल्हास नदी यासह महाराष्ट्रातील बहुतांश शहरातील तलाव, नद्यांना जलपर्णीने आपल्या कवेत घेतले आहे. गाजर गवताची खासियत म्हणजे ते अमेरिकेच्या मेक्सिकोतून भारतात आल्यावर सर्वप्रथम दुर्दैवाने पुण्यातच आढळले होते. दरम्यान, जलपर्णी ही वायुवेगाने वाढणारी वनस्पती जलचर प्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.
तिचे साम्राज्य असेच वाढत राहिल्यास भविष्यात पूरक अन्न म्हणून आपण ज्या मासोळ्यांकडे पाहतो त्या नामशेष होतील. हो, ही बाब शंभर टक्के सत्य असून जलपर्णी जेव्हा वायुवेगाने वाढते तेव्हा पाण्यावर आच्छादन तयार करते. ज्यामुळे सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन आत जाऊ शकत नाही. परिणामी जलचर प्राणी तडफडून मरतात. आता सर्वत्र जलपर्णीच राहील तर मासोळ्या, कासव, खेकडे, मगरांसह लाखो जलचर प्राण्यांनी जगावे तरी कसे, हा प्रश्न उद्भवला आहे. भीतिदायक म्हणजे जलपर्णी केवळ नागपुरातच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात तिचा वायुवेगाने विस्तार करीत आहे. जलपर्णी ही दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वनस्पती आहे. सांडपाण्यातील नायट्रोजन, फॉस्फरसमुळे जलपर्णीचा विळखा वाढला आहे. जलपर्णीसाठी सांडपाणी आणि त्यातील मानवी मलमूत्र, साबण पोषक असतात. जलपर्णीचे बीज तयार झाल्यावर ते चिखलात 30 वर्षांपर्यंत टिकून राहते. जलपर्णी दाट प्रमाणात पाण्यावर आच्छादन तयार करते. यामुळे मासोळ्यांना लागणारे अन्न मिळेनासे झाल्याने जलचर प्राणी घटतात. नदीचा प्रवाह खुंटतो. डासांचा प्रादुर्भाव वाढत जातो. डास वाढल्याने मलेरिया, हत्तीपाय, डेंग्यूसारखे आजार मानवासाठी कर्दनकाळ ठरतात. हे धोके असताना काही फायदेही आहेत. त्यानुसार जलपर्णीचा उपयोग कागद तयार करण्यासाठी होऊ शकतो. त्यापासून सेंद्रिय खतही तयार होते.
Jalparni Sankat शिवाय त्यापासून चटया, पिशव्या, विविध गृहोपयोगी शोभेच्या वस्तू बनविता येतात. जलपर्णीचा उपयोग बायोगॅस निर्मितीसाठी होऊ शकतो. इराण युद्धामुळे भारतात एलपीजीचा तुटवडा कायम असल्याने बायोगॅसकरिता शासनाने पुढाकार घ्यायला हवा. आता लाभ आणि तोटे समोर आल्याने यासंदर्भात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जलपर्णीने घातलेला मृत्यूचा वेढा आपण संधीत परावर्तित करू शकतो. याकरिताच आता शासनाने संकटातूनही संधी शोधून जलपर्णीचा उपयोग करून घ्यायला हवा. सरकारला शक्य नसल्यास खाजगी कंपन्यांना तिचा उपयोग करण्याची परवानगी द्यायला हवी. ज्या पद्धतीने सापाच्या विषापासूनच औषध तयार करून मानवाचे संरक्षण केले जाते. सापाचे जीवघेणे विष उपयोगी पडू शकते, मग त्याच धर्तीवर जलपर्णीचा सदुपयोग वाढवायलाच हवा. कुठल्याही गोष्टीला विरोध करून लाभ होत नसतात. त्यातील चांगले वाईट गुण हेरून त्यानुसार दिशा ठरवावी लागते. पुढील काळात हीच दिशा ठरविल्यास जलपर्णीचा विळखा लाभदायक ठरेल, जेव्हा चारही बाजूने जलपर्णीची मागणी वाढेल तेव्हा ती वनस्पती आपोआपच संपुष्टात येईल. त्यापूर्वी नदी, नाले आणि तलावात सोडले जाणारे पाणी स्वच्छ असायला हवे. सांडपाणी हे जलपर्णीसाठी पोषक आहे. पण शुद्ध पाण्यात जलपर्णी वाढतच नाही. समजा आपण सांडपाणी तलावात आणि नद्यांमध्ये सोडलेच नाही तर त्याही स्वच्छ राहतील. पर्यायाने जलपर्णी वाढणार नाही. शेवटी, आपण निसर्गाप्रति काही देणे लागतो ना, त्यानुसार जलपर्णीच्या भीतिपोटी कृतीही आपल्या हातून घडेल. गाजर गवत लोकाश्रयातून कमी झाले; तद्वतच जलपर्णीचाही विळखा आपण सहजतेने संपुष्टात आणू शकतो, याची खात्री आहे. कारण जेव्हा केव्हा या भारतात लोकचळवळ सुरू झाली, तेव्हा येथील समस्यांनीच पळ काढला आहे.
9881717859