नवी दिल्ली,
Kohli-Travis Head Altercation आयपीएल २०२६ मधीलरॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर मोठा वाद चर्चेत आला आहे. मैदानावर सुरू झालेला तणाव सामना संपल्यानंतरही कायम राहिल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत बंगळूरसमोर २५५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. इशान किशन याने ७९ धावांची शानदार खेळी केली, तर भिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनीही आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या भक्कम केली.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली. व्यंकटेश अय्यरने केवळ १९ चेंडूंमध्ये ४४ धावांची झंझावाती खेळी केली. मात्र, त्यानंतर संघाची गाडी घसरली. विराट कोहलीलाही मोठी खेळी करता आली नाही आणि तो १५ धावांवर बाद झाला. कर्णधार रजत पाटीदार याने अर्धशतक झळकावले, पण संघाला विजय मिळवून देता आला नाही. अखेर बंगळूर संघ लक्ष्यापासून दूर राहिला आणि हैदराबादने मोठा विजय मिळवला. सामन्यादरम्यान कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात काहीशा तीव्र शब्दांत चर्चा झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर सामना संपल्यानंतर खेळाडू हस्तांदोलन करत असताना हा तणाव पुन्हा समोर आला.
कोहलीने पॅट कमिन्सला याच्याशी हस्तांदोलन केले, मात्र ट्रॅव्हिस हेडने हात पुढे करूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करत कोहली पुढे निघून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, काही चाहत्यांनी कोहलीच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पराभव असूनही आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचेही समान गुण असले तरी बंगळूरचा नेट रनरेट अधिक चांगला आहे. आता क्वालिफायर-१ मध्ये बंगळूरचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होणार असून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या मोठ्या सामन्याकडे लागले आहे.