डिझेल, पेट्रोल वाहनधारकांसाठी माणुसकीचे दर्शन
वाशीम,
Mahalakshmi Petrol Pump गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यामुळे सर्वत्र चिंतेचे आणि तणावाचे वातावरण आहे. रणरणत्या उन्हात डिझेल-पेट्रोलसाठी पंपांवर नागरिकांच्या आणि विशेषतः बळीराजाच्या मैलोन्मैल लांब रांगा लागल्या आहेत. अशा कठीण प्रसंगात वाशीम शहरातील महालक्ष्मी पेट्रोल पंपाने व्यावसायिक नफ्याचा विचार बाजूला सारून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून या पंपाच्या वतीने रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या नागरिकांसाठी आणि शेतकर्यांसाठी स्वखर्चाने मोफत शुद्ध आर.ओ. फिल्टर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची आणि नांगरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशा वेळी ट्रॅटरसाठी डिझेल मिळवणे शेतकर्यांसाठी अत्यंत गरजेचे झाले आहे. पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच शेकडो शेतकरी डिझेलच्या कॅन घेऊन लांबच लांब रांगेत उभे राहत आहेत. मे महिन्याच्या या कडक उन्हात आणि घामाच्या धारांमध्ये तासनतास उभे राहिल्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत.शेतकर्यांची हीच अडचण ओळखून महालक्ष्मी पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाने अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला. रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीला थंड आणि शुद्ध पिण्याचे पाणी घरपोच दिल्यासारखे जागेवर जाऊन वाटप केले जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणत्याही प्रकारची मदत न घेता संपूर्ण खर्च व्यवस्थापनाने स्वतःच्या खिशातून केला आहे.
Mahalakshmi Petrol Pump वाशीममधील या छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमाने संपूर्ण राज्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. जर अशाच प्रकारे इतर व्यापारी, सामाजिक संस्था आणि सजग नागरिकांनी आपापल्या पातळीवर अशा लहान-सहान मदतीचा हात पुढे केला, तर इंधन संकटामुळे निर्माण झालेला ताण नक्कीच कमी होऊ शकतो. कठीण काळात केवळ प्रशासनावर विसंबून न राहता माणुसकी कशी जपावी, याचे हे उत्तम उदाहरण आहे.