माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

    दिनांक :23-May-2026
Total Views |
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
 
गडचिरोली :
Maoist Arms Manufacturing Factory जिल्ह्यातील माओवाद जवळपास संपुष्टात येत असताना जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेले माओवादी साहित्य शोधून नष्ट करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला असून घटनास्थळीच विविध साहित्य नष्ट करण्यात आले.
 
 
Maoist Arms
 
माओवादी संघटना शासनविरोधी घातपाताच्या कारवायांसाठी शस्त्रे व स्फोटक साहित्य जंगल परिसरात गुप्तपणे जमिनीत पुरून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. निवडणुका, नक्षल सप्ताह तसेच सुरक्षा दलांवर हल्ले घडवून आणण्यासाठी या साहित्याचा वापर केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत जंगलातील लपविलेले साहित्य शोधून काढत माओवाद्यांच्या कारवायांना मोठा धक्का दिला आहे.
 
 
‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत १६ मे रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत पोमके-बिनागुंडा हद्दीतील जंगल परिसरात शस्त्रनिर्मिती व इतर साहित्य लपवून ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार २१ मे रोजी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता दलाच्या सहा तुकड्या तसेच बीडीडीएसच्या दोन पथकांना शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले.
 
 
Maoist Arms Manufacturing Factory  २२ मे रोजी पोमके-बिनागुंडाच्या उत्तरेकडील जंगल परिसरात घेरा घालून बीडीडीएसच्या जवानांनी कसून तपासणी केली असता एक लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, १२ बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल, २० फुटी फुटबॉल पाईप आदी साहित्य हस्तगत करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
 
 
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता आणि बीडीडीएसच्या जवानांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी सहभागी जवानांचे विशेष कौतुक केले.