रत्नागिरी
Kodavali Shankheshwar Mahadev temple कोदवली येथील प्राचीन श्री शंकरेश्वर महादेव मंदिरात मराठाकालीन काळातील तीन शिलालेख आढळून आल्याने कोकणातील इतिहास संशोधनाला नवी दिशा मिळाली आहे. मंदिराच्या विविध भागांत सापडलेल्या या शिलालेखांमुळे त्या काळातील धार्मिक परंपरा, जीर्णोद्धार कार्य, बंदर प्रशासन तसेच स्थानिक समाजजीवन याबाबत महत्त्वपूर्ण माहिती उजेडात आली आहे.
हे शिलालेख मराठाकालीन उत्तरार्धातील असून सुमारे इ.स. १८४४–४५ या कालखंडातील असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते, हे शिलालेख केवळ धार्मिक नोंदी नसून त्या काळातील सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थेचेही महत्त्वाचे दस्तऐवज आहेत.
मंदिराच्या गाभाऱ्याच्या Kodavali Shankheshwar Mahadev temple उजव्या भिंतीवर आढळलेल्या पहिल्या शिलालेखात श्री शंकरेश्वर देवालयाच्या मूळ बांधकामाचा तसेच नंतर झालेल्या जीर्णोद्धाराचा तपशील नोंदवलेला आहे. सिद्धेश्वर बाबा गोसावी यांनी मूळ मंदिर उभारल्याचा उल्लेख असून, पुढे चिमणाजी हाणमाजी बोरवणकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आढळते. या लेखात “पंतकी बंदर वीस राजापूर” असा उल्लेखही आढळतो, ज्यामुळे त्या काळातील बंदर व्यवस्थापनाशी संबंधित दुवे समोर येत असल्याचे संशोधकांचे मत आहे.गोमुख कुंड परिसरातील पायऱ्यांच्या भिंतीवर सापडलेल्या दुसऱ्या शिलालेखातही जीर्णोद्धाराचीच नोंद आहे. “श्री शंकरेश्वर चरणी जीर्णोद्धार” असा स्पष्ट उल्लेख करत चिमणाजी हाणमाजी बोरवणकर यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले आहे. या लेखातील दिनांकावरून हा शिलालेख १८४४ सालातील असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.तिसरा शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीवर आढळला असून तो अधिक विस्तृत आणि भक्तिभावपूर्ण शैलीत कोरलेला आहे. “स्वस्ति श्री नृप शालिवाहन शके” अशा पारंपरिक मांडणीने सुरू होणाऱ्या या लेखात धार्मिक विधी, शुभमुहूर्त आणि दानकार्य यांचा सविस्तर उल्लेख आहे. या शिलालेखातही बोरवणकर घराण्याचा उल्लेख असून त्यांनी मंदिराच्या देखभाल व संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट होते.
या तिन्ही Kodavali Shankheshwar Mahadev temple शिलालेखांमधून कोकणातील मंदिर संस्कृती, स्थानिक प्रशासन आणि व्यापारी बंदरव्यवस्था यांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुरावे उपलब्ध झाल्याचे इतिहासतज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषतः कालगणना, तिथी, वार, नक्षत्र यांचा अचूक वापर केल्याने त्या काळातील ज्योतिषाधारित कालमापन पद्धती किती विकसित होती याचाही प्रत्यय येतो.संशोधकांच्या मते, हे शिलालेख कोदवली परिसरातील सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास समजून घेण्यासाठी अमूल्य ठेवा ठरतील. या शोधामुळे शंकरेश्वर मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून स्थानिक इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.