दिल्लीच्या फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग

३०० दुकाने जळून खाक होण्याची भीती

    दिनांक :23-May-2026
Total Views |
दिल्ली, 
fire in delhis furniture market दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये काल रात्री उशिरा भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बाजार परिसरात घबराट पसरली. फर्निचर बाजार असल्याने मोठ्या प्रमाणावर लाकूड, प्लायवूड आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आग अत्यंत वेगाने पसरली. काही मिनिटांतच आग अनेक दुकानांमध्ये पसरल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने वाचवण्यासाठी धावपळ केली, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
 
 
 दिल्लीच्या फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग
 
 
स्थानिक नागरिकांनी आणि दुकानदारांनी स्वतःच्या पातळीवर आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग अधिकच भडकत गेली. या घटनेदरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा पोहोचल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला, त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने गोंधळ घालत अग्निशमन दलाच्या वाहनांवर दगडफेक केल्याचीही माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.fire in delhis furniture market प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे २५० ते ३०० दुकाने जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, याच रात्री नोएडातील लोटस बुलेवार्ड सोसायटीतही आग लागल्याची घटना घडली असून, २७ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही, मात्र दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.