विषाक्त पाणी पिल्याने तीन रानगव्यांचा मृत्यू

    दिनांक :23-May-2026
Total Views |
एक हरिण दगावले
मेळघाटची घटना
 
धारणी, 
Melghat Tiger Reserve Case मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या धारणी तालुक्यातील चौराकुंड वनपरिक्षेत्रात तीन रानगवे आणि एक हरिण विषारी पाणी प्यायल्याने दगावल्याची धक्कादायक घटना आज समोर आली. चौराकुंड वनपरिक्षेत्रातील उत्तर अंजन झडप आणि चौराकुंड उत्तर खंड परिसरात जंगलगस्ती दरम्यान वन कर्मचार्‍यांना तीन रानगवे मृतावस्थेत आढळून आले. याच भागात एक हरिण देखील मृत अवस्थेत सापडला. रानगव्यांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती मिळताच चौराकुंड वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र खेरडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली. माहितीनुसार, विषारी पाणी प्यायल्याने या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
dksls
 
Melghat Tiger Reserve Case  या घटनेबाबत शुक्रवारी दुपारी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची चमू तसेच मेळघाटात कार्यरत काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा ३ रानगव्यांसह एका हरिणाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, प्राथमिक तपासात विषारी पाणी पिल्यामुळेच या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. उन्हाळ्यामुळे सध्या जंगलातील नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे वनविभागाकडून जंगलात कृत्रिम पाणवठ्यांच्या माध्यमातून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर अंजन झडप आणि चौराकुंड उत्तर खंड परिसरात घडलेल्या या घटनेनंतर संबंधित पाणवठ्यांचे नमुने तसेच मृत प्राण्यांच्या शरीरातील अवयव फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती चौराकुंड वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र खेरडे यांनी दिली. सदर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. जंगलात शुक्रवारी रात्रीपासून गस्त वाढवण्यात आली असून आजही वनकर्मचार्‍यांकडून सतत निरीक्षण सुरू आहे. परिसरातील इतर पाणवठ्यांचेही पाणी तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले.