मुंबई,
Mumbai Rain Alert राज्यातील हवामानात अचानक मोठा बदल झाला असून मुंबई, कोकण आणि विदर्भातील अनेक भागांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. मुंबईसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील काही तासांत पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने नाऊकास्टद्वारे हा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील अडीच ते तीन तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. यासोबतच मुंबई, रायगड आणि रत्नागिरीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर उष्णतेची तीव्र लाट जाणवत होती. मात्र, अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.मराठवाड्यातील काही भागांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ झाले असून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील आठवड्यापर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी मान्सूनपूर्व पावसाने आधीच जोर पकडला आहे.
इगतपुरीमध्ये अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट सुरू असून अनेक भागांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंपरी-चिंचवड, खेड आणि इतर शहरांमध्येही काल जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.