छत्रपती संभाजीनगर
Cockroach Janta Party देशभरात नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेवरून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाने सुरू झालेला एक नवा प्रयोग प्रचंड चर्चेत आला आहे. या पक्षाशी संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सने अवघ्या काही दिवसांत मोठी लोकप्रियता मिळवत लक्ष वेधून घेतले असून, त्यामागील अभिजीत दिपके या युवकाला धमक्या मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या हिंगोलीतील निवासस्थानाबाहेर सुरक्षा तैनात केली आहे.
सरन्यायाधीशांनी युवकांच्या भूमिकेबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेत अभिजीत दिपकेंनी सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाने उपक्रम सुरू केला. काही दिवसांतच या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट्सने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळवला असून, अवघ्या चार दिवसांतच लाखो फॉलोअर्सचा टप्पा ओलांडल्याचे सांगितले जात आहे. या वाढत्या लोकप्रियतेसोबतच काही ठिकाणी त्यांच्यावर टीका आणि विरोधही वाढू लागला आहे.
दरम्यान, अभिजीत दिपकेंना Cockroach Janta Party दोन दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप त्यांनी स्वतः सोशल मीडियावर केला आहे. संबंधित मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली होती. या प्रकारानंतर त्यांच्या कुटुंबीयांनीही चिंता व्यक्त केली असून, सतत वाढणाऱ्या प्रतिसादासोबत निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत भीती व्यक्त केली आहे.या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पोलिस प्रशासनाच्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील वाढत्या चर्चेमुळे आणि संभाव्य संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात आली आहे. पुढील काही दिवस सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अभिजीत दिपके यांच्या कुटुंबाचा पार्श्वभूमीवरही या प्रकरणात चर्चा होत आहे. वडील सेवानिवृत्त अभियंता असून आई गृहिणी आहेत. मूळचे हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील असलेले कुटुंब सध्या छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात वास्तव्यास आहे. अभिजीत यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केले असून, पुढील शिक्षणासाठी ते परदेशात गेले असल्याची माहिती आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडिया, राजकीय अभिव्यक्ती आणि युवकांचा वाढता सहभाग यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाने मात्र परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.