इस्लामाबाद,
Petrol reduced in Pakistan जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू लागले आहेत. इराण-अमेरिका संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमतीत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान सरकारने मात्र नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात जाहीर केली आहे.पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ६ रुपयांची कपात केली असून हाय स्पीड डिझेलही ६.८० रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. नव्या दरांनुसार पेट्रोलची किंमत ४०३.७८ रुपये प्रतिलिटर झाली असून डिझेलचा दर ४०२.७८ रुपये प्रतिलिटर इतका निश्चित करण्यात आला आहे. हे नवे दर २३ मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे सलग दुसऱ्या आठवड्यात पाकिस्तानने इंधन दर कमी केले आहेत. याआधीही सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे ५ रुपयांची कपात केली होती. त्यामुळे वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा वापर खासगी वाहने, दुचाकी, रिक्षा आणि छोट्या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे दरकपातीचा थेट फायदा मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिकांना होणार आहे. दुसरीकडे, हाय स्पीड डिझेल हे मालवाहतूक आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रासाठी अत्यावश्यक असल्याने वाहतूक खर्चातही काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये इंधन दरांनी विक्रमी पातळी गाठली होती. इराण-इस्रायल संघर्ष तीव्र झाल्यानंतर मार्च महिन्यात सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल ५५ रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर एप्रिलमध्येही पुन्हा दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता झालेली दरकपात ही नागरिकांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे.जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे आर्थिक आणि राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. वाढत्या महागाईच्या काळात इंधन दर कमी करून सरकारने जनतेला काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.