इव्हांका ट्रम्प हत्येचा कट उधळला!

आयआरजीसी प्रशिक्षित दहशतवाद्याला अटक

    दिनांक :23-May-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Plot to Assassinate Ivanka Trump Foiled अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प हिच्या हत्येचा कट उधळल्याचा दावा अमेरिकन तपास यंत्रणांनी केला आहे. या प्रकरणात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) शी संबंधित एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयिताकडे इव्हांका ट्रम्प यांच्या निवासस्थानाचा नकाशा सापडला आहे. या माहितीवरून तिच्यावर हल्ला करण्याचा कट आखण्यात येत असल्याचा संशय बळावला आहे.
 
 
Trump Foiled
 
या प्रकरणात आणखी एक मोठा आरोप समोर आला असून, इराकी नागरिक मोहम्मद बाकेर अल-सादी याचा या कटाशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. तो ‘कताइब हिजबुल्लाह’ या गटाचा वरिष्ठ सदस्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. हा गट अमेरिकेविरुद्ध हल्ल्यांची योजना आखत असल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे.अमेरिकन तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हा कट इराणचे सैन्य कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत संवेदनशील स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, या घटनेनंतर अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी ट्रम्प कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत सतर्कता वाढवली असून संभाव्य धोके लक्षात घेऊन कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे अमेरिका-इराण तणाव पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे दिसत आहे.