भारताच्या नंदनवनात विकासाची सुवर्णपहाट!

जम्मू-काश्मीरमध्ये ५,८२४ कोटींची विक्रमी गुंतवणूक

    दिनांक :23-May-2026
Total Views |
श्रीनगर,
Record Investment in Jammu and Kashmir एकेकाळी दहशतवाद, दगडफेक आणि अस्थिरतेसाठी चर्चेत असलेले जम्मू-काश्मीर आता विकास आणि गुंतवणुकीच्या नव्या वाटेवर वेगाने पुढे जाताना दिसत आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशात मोठे बदल घडू लागले असून त्याचा सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. उद्योग, रोजगार, स्टार्टअप्स आणि पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ जम्मू-काश्मीरच्या बदलत्या चित्राची साक्ष देत आहे.केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसाठी जाहीर केलेल्या २८,४०० कोटी रुपयांच्या विशेष औद्योगिक योजनेला अपेक्षेपेक्षा तिपटीने अधिक प्रतिसाद मिळाला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या प्रदेशात तब्बल ५,८२४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून हा आकडा पूर्वीच्या तुलनेत विक्रमी मानला जात आहे. २०२१ पूर्वी दरवर्षी होणाऱ्या गुंतवणुकीच्या तुलनेत ही वाढ तब्बल १३ पट अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
 

kashmir investment
 
प्रकल्पांमध्ये उत्पादनाला सुरुवात
विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरच्या इतिहासात प्रथमच ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अनेक मोठे प्रकल्प प्रत्यक्षात उभे राहत आहेत. काही प्रकल्पांमध्ये उत्पादनालाही सुरुवात झाली आहे. ‘न्यू सेंट्रल सेक्टर स्कीम’ अंतर्गत नोंदणीकृत ४४० प्रकल्पांपैकी सुमारे ३०० प्रकल्प सुरू झाले आहेत. याशिवाय १७,८६१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ११२ प्रकल्प अंतिम टप्प्यात असून चालू आर्थिक वर्षात त्यांच्यातही उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग क्षेत्रात झालेल्या या वाढीमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली आहे. चिरिपाल पॉलीफिल्म्स, कंधारी बेव्हरेजेस आणि एजिससारख्या कंपन्यांचे मोठे प्रकल्प सुरू झाले आहेत. आगामी काळात ज्युपिटर ॲल्युमिनियम, धुन्सेरी पॉलीफिल्म्स आणि ऑर्किड बायो-फार्मा यांसारख्या कंपन्यांचे प्रकल्पही कार्यान्वित होणार आहेत.
 
 

स्टार्टअप संस्कृतीलाही चालना
उद्योगांसोबतच स्टार्टअप संस्कृतीलाही जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चालना मिळाली आहे. २०२० मध्ये येथे केवळ ६९ स्टार्टअप्स नोंदणीकृत होते, तर आता त्यांची संख्या १,३०० पेक्षा अधिक झाली आहे. यातील अनेक स्टार्टअप्सना सरकारकडून आर्थिक मदत आणि इन्क्युबेशन सुविधा दिल्या जात आहेत.व्यवसाय सुलभतेच्या निर्देशांकातही जम्मू-काश्मीरने मोठी झेप घेतली आहे. ‘बिझनेस रिफॉर्म्स ॲक्शन प्लॅन-२०२४’मध्ये जम्मू-काश्मीरने देशात पाचवे स्थान मिळवले आहे. तसेच निर्यात प्रोत्साहन निर्देशांकातही या केंद्रशासित प्रदेशाने मोठी प्रगती नोंदवली आहे.
 
 
विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल
सरकारी आकडेवारीनुसार, उद्योग नोंदणी आणि सहकारी संस्थांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. २०२० च्या तुलनेत आता हजारो नवीन उद्योग आणि संस्था येथे उभ्या राहत आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीर गुंतवणुकीसाठी नवे केंद्र बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये केवळ सुरक्षा व्यवस्थेतच नव्हे, तर आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातही मोठे परिवर्तन घडत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या जम्मू-काश्मीरकडे आता देशभराचे लक्ष लागले आहे.