भारतभरातून आलेल्या शिक्षार्थींचे पथसंचलन

    दिनांक :23-May-2026
Total Views |
-महाल चौकात दोन्ही पथसंचलनांचा अपूर्व संगम
-ठिकठिकाणी स्वागत

नागपूर, 
Rss pathsanchalan रा. स्व. संघ कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयसाठी देशभरातून आलेल्या शिक्षार्थीनी शनिवारी सायंकाळी रेशीमबाग, जुनी व नवी शुक्रवारी, महाल परिसरात पथसंचलन करून शिस्तबद्धतेचे दर्शन घडवले. विविध प्रांतांतून आलेल्या विविध भाषक स्वयंसेवकांनी घोषाच्या तालावर शिस्तबद्ध पथसंचलन करून एकत्वाचे दर्शन घडविले. घोष पथकाचे वाहन, त्या तालावर स्वयंसेवकांचे पथसंचलन सुरू होते. महाल चौकात दोन मार्गानी आलेल्या पथसंचलनांचा अपूर्व संगम यावेळी उपस्थित नागरिकांनी अनुभवला. दोन्ही पथसंचलने एकाच वेळी रेशीमबागेतून निघाली होती.
 
 
pathsanchalan
 
पहिले पथसंचलन रेशीमबागेतील द्वार क्रमांक दोनमधून (सी.पी. अँड बेरार) निघाले. लोकांची शाळा, अशोक चौक, उजवीकडे थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे महाल चौकात तसेच दुसरे पथसंचलन द्वार क्रमांक पाचमधून निघून गजानन चौक, डावीकडे जुनी शुक्रवारीतून थेट झेंडा चौक, डावीकडे थेट कल्याणेश्वर मंदिरासमोरून महाल चौकात सायंकाळी ठीक 6.55 वाजता एकत्र आले. महाल चौकात रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, वर्गाचे सर्वाधिकारी सरदार महेंद्रसिंग मग्गो, वर्गाचे पालक अधिकारी सहसरकार्यवाह अतुल लिमये, अ.भा. कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, सुरेश सोनी या पथसंचलनाचे अवलोकन केले.
पथसंचलन मातृसेवा संघ, सी.पी. अँड बेरार कॉलेज मार्गाने रेशीमबागेत पोहोचले.
 
 
Rss pathsanchalan  या संपूर्ण मार्गात दुतर्फा उभ्या नागरिकांनी दोन्ही पथसंचलनाचे उत्साहात स्वागत केले. भगव्या ध्वजावर पुष्पवर्षाव केला. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी भारत मातेचा जयघोष नागरिक करीत होते. रेशीमबागस्थित डॉ. हेडगेवार भवन परिसरात कार्यकर्ता विकास वर्ग- द्वितीय 11 मेपासून प्रारंभ झाला. यंदाच्या वर्गात आसेतु हिमाचल देशभरातील 880 शिक्षार्थी सहभागी झाले आहेत.
 
 
शिस्त, सुरक्षा, पोलिस
पथसंचलनासाठी कोतवाली पोलिसांनी कडक सुरक्षा ठेवली होती. पथसंचलनांसमोर, मागे दोन्ही बाजूंनी पोलिस चालत होते. वाहनांत बसलेले पोलिस आजूबाजूला लक्ष ठेवून होते. याशिवाय दोन्ही मार्गावर पुरुष व महिला पोलिसांचा बंदोबस्त होता. साध्या वेशातील पोलिसांसह इमारतींवरून दुर्बिणीद्वारे पोलिस लक्ष ठेवून होते. स्वयंसेवकांचे घोषाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन, वेळेत निघून, पोहोचणे, महाल चौकात एकत्र येणे आदी नियोजन उत्तम होते. मुख्य म्हणजे पथसंचलनासाठी वाहतूक खुप वेळ थांबवण्यात आली नव्हती. पथसंचलन चौकात पोहोचण्याच्या अगदी काही मिनिटे पोलिस वाहतूक थांबवत होते. पथसंचलन चौकातून पुढे गेल्यावर काही मिनिटांनी वाहतूक सुरू करीत होते. वाहतूक पोलिसांच्या कौशल्यामुळे वाहतूक जाम झाली नाही, हे विशेष.