नागपूर,
Schools will reopen on June 26 विदर्भात वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यंदा शाळा नेहमीपेक्षा उशिरा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा यंदा २६ जूनपासून सुरू करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती मंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. सध्या विदर्भातील अनेक भागांत तापमानाने ४७ अंशांचा टप्पा ओलांडला असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, १० जूननंतर हवामानाचा पुन्हा आढावा घेतला जाईल. जर उष्णतेची लाट कायम राहिली, तर शाळा १५ जूनऐवजी २६ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शालेय शिक्षण विभाग याबाबत लवकरच बैठक घेणार असून अंतिम निर्णय त्यानंतर जाहीर केला जाईल.वाढत्या तापमानाचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवरही दिसून येत आहे. नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्याचाही विचार सुरू आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागांत उष्णतेसोबतच अवकाळी पावसाचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा बदलत्या हवामानामुळे प्रशासन सतर्क झाले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देत निर्णय घेतले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.