पवारांकडे ‘रयत’ची महत्त्वाची जबाबदारी

पवार गटातील समीकरणांवर चर्चा तीव्र

    दिनांक :23-May-2026
Total Views |
पुणे/मुंबई
Rayat Shikshan Sanstha राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध भेटीगाठी आणि संघटनात्मक निर्णयांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने विविध राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. या भेटीनंतर शरद पवार गटात अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
 
 
Rayat Shikshan Sanstha
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार काही घडामोडींमुळे नाराज असल्याच्या आणि पक्षाच्या काही बैठकींना अनुपस्थित राहिल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत शरद पवारांनी रोहित पवारांवर एक महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे.
रोहित पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. मागील सहा वर्षांपासून ते संस्थेचे सदस्य म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे उत्तर विभागाचे अध्यक्षपद देण्यात आल्याने त्यांच्या संघटनात्मक भूमिकेला नवी दिशा मिळाल्याचे मानले जात आहे.या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव करत शरद पवार आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने संस्थेचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
 
 
दरम्यान, सन २०२६ ते २०२९ या Rayat Shikshan Sanstha  कालावधीसाठी शरद पवार  यांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित झाली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.शरद पवार यांनी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा स्वीकार करून रयत शिक्षण संस्थेला जागतिक दर्जावर नेण्याचा मानस व्यक्त केला असून परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी भागीदारी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाढवण्यासह संस्थेच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचेही त्यांनी सूतोवाच केले आहे.या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणे, नेतृत्वाची भूमिका आणि संघटनात्मक निर्णय यावर पुन्हा एकदा राजकीय लक्ष केंद्रीत झाले असून आगामी काळात पक्षातील हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.