मानोरा,
Shreya Jaiswal वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुयातील इंझोरी येथील श्रेया प्रमोद जयस्वाल हिने एमसीए सीईटी परीक्षेत ९९.५८ टक्के गुण मिळवत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे वाशीम जिल्ह्यासह मानोरा तालुका आणि इंझोरी गावाच्या शिरपेचात मानाचातुरा रोवला गेला असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Shreya Jaiswal महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या एमसीए सीईटी परीक्षेचा निकाल आज, २० मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. या निकालात इंझोरी येथील व्यावसायिक प्रमोद जयस्वाल यांची कन्या श्रेया प्रमोद जयस्वाल हिने ९९.५८ टक्के गुण मिळवत राज्यात अव्वल क्रमांक पटकावला. अत्यंत मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर श्रेयाने हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून येत राज्यस्तरीय परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात असून श्रेयाच्या या यशामुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकाल जाहीर होताच गावातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिच्या निवासस्थानी भेट देत अभिनंदन केले. श्रेया हिच्या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही राज्यस्तरावर झेंडा फडकवू शकतात, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. तिच्या या यशामुळे इंझोरी गावासह संपूर्ण वाशीम जिल्ह्याचा शैक्षणिक गौरव वाढला आहे.
छायाचित्र- श्रेया जयस्वाल