उत्तर २४ परगणा,
Suspicious Death of Trinamool Councilor पश्चिम बंगालच्या दक्षिण दमदम परिसरातून धक्कादायक घटना समोर आली असून तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक संजय दास यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दमदम नगरबाजार परिसरात ही घटना घडली. मृतदेह तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आला असून प्राथमिक माहितीप्रमाणे आज शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
संजय दास हे माजी आमदार अदिती मुन्शी यांचे पती होते तसेच तृणमूल काँग्रेसमधील स्थानिक नेते देबराज चक्रवर्ती यांच्याशी त्यांचे निकट संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील राजकीय बदलांनंतर ते काही प्रमाणात मानसिक तणावाखाली असल्याचे बोलले जात आहे. मात्र या संदर्भात अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून पश्चिम बंगालमधील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. विविध राजकीय घडामोडी आणि मागील निवडणुकांतील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.