चंद्रपूर,
dr ravikant khobragade चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात कडक उन्हाळ्यात घडलेला शुक्रवारचा मानव-वन्यजीव संघर्ष हा वाघ ‘नरभक्षक’ झाल्यामुळे नसून, अतिउष्णतेमुळे त्यांच्या शरीरावर आणि वर्तनावर झालेल्या दुष्परिणामांमुळे असावा, असे मत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) तथा जलद बचाव गट प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी मांडले आहे. ते म्हणाले, वाघ हे ‘होमियोथर्मिक’ प्राणी आहेत, म्हणजेच त्यांना त्यांच्या शरीराचे अंतर्गत तापमान स्थिर ठेवावे लागते. मात्र, त्यांच्या शरीरशास्त्रात मानवासारख्या घामाच्या ग्रंथी नसतात. वाघ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने ‘पौटंग’ आणि पाण्यात बसून राहणे या पद्धतींचा वापर करतात.
जेव्हा बाहेरील तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तेव्हा वातावरणातील उष्णतेचा प्रवाह प्राण्याच्या शरीराच्या आत जातो. जर प्राण्याला पाण्याचा स्त्रोत मिळाला नाही, तर त्याची उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता संपते, ज्याला हायपरथर्मिया किंवा ‘हिट स्ट्रेस’ म्हणतात. शरीराचे तापमान मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यास प्राण्याच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होतो. तीव्र उष्णतेमुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स अचानक वाढतात. यामुळे प्राण्यामध्ये ‘हायपर-इरिटेबिलिटी’ आणि ‘फ्रस्ट्रेशन-अॅग्रेशन सिंड्रोम’ निर्माण होतो. अशा स्थितीत वाघ अत्यंत लहान कारणानेही उद्दीपित होतो आणि हिंसक बनतो.
उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात तेंदूपत्ता संकलनाचे काम चालते. तीव्र उष्णतेपासून वाचण्यासाठी वाघ ज्या घनदाट सावलीच्या किंवा ओढ्यांच्या भागात आश्रय घेतात, त्याच भागात अनेकदा तेंदूची झाडे असतात. त्यामुळे वाघ आणि मानव एकाच ‘मायक्रो-हॅबिटॅट’ मध्ये समोरासमोर येतात. तेंदूपत्ता गोळा करताना महिला जमिनीकडे वाकलेल्या असतात. वाघाची दृष्टी प्रामुख्याने हालचाली आणि आकृतीवरून भक्ष्य ठरवते. वाकलेली मानवी आकृती ही वाघाला चार पायांचा नैसर्गिक भक्ष्य असल्याचा संभ्रम निर्माण करू शकते, ज्यामुळे त्याची ‘प्रिडेटरी अर्झ’ (शिकार करण्याची प्रवृत्ती) तीव्र होते.
‘डब्लूएनएल’ आणि ‘सीसीएमबी’च्या संशोधनानुसार, तीव्र उन्हाळ्यात वाघांच्या शरीरात ‘कॉर्टिसोल’ (स्ट्रेस हार्मोन) प्रचंड वाढते. घामाच्या ग्रंथी नसलेल्या वाघांमध्ये यामुळे ‘हायपरथर्मिया’ (मज्जासंस्थेवरील ताण) निर्माण होतो, ज्यामुळे ते कमालीचे चिडचिडे आणि हिंसक बननात. जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्यामुळे वाघ पाण्याच्या शोधात मानवी वस्त्या व शेतांकडे येतात. विशेषतः आईपासून वेगळे झालेले अननुभवी, तरुण वाघ मुख्य पाणवठ्यांवर अधिकार न मिळाल्याने जंगलाच्या टोकाला राहतात, ज्यामुळे मानवासोबत थेट संघर्ष वाढतो.dr ravikant khobragade वाघ सहसा उभ्या मानवी आकृतीवर हल्ला करत नाही. मात्र, जंगलात तेंदूपत्ता गोळा करताना जेव्हा मजूर खाली वाकतात, तेव्हा वाघाला तो चार पायांचा प्राणी असल्याचा भास होतो. आधीच ‘हिट स्ट्रेस’ने बिथरलेला वाघ अशा वेळी कसलाही विचार न करता थेट हल्ला करतो.
वन्यजीव व्यवस्थापनात अशा वाघांना ‘ट्रांझिएंट’ किंवा भटकणारे वाघ म्हटले जाते. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी परिसरातील उच्च व्याघ्र घनतेमुळे सध्या तेथील कॉरिडोअर्सवर प्रचंड ताण आहे, अशीही माहिती डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी दिली.