भोपाळ,
Twisha Sharma's Husband's Law License Suspended भोपाळमध्ये ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई समोर आली असून या प्रकरणात आरोपी असलेले पती समर्थ सिंग यांच्या वकिली व्यवसायावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरात चर्चेला उधाण आले आहे. ट्विशा शर्मा यांचा विवाहानंतर काही महिन्यांतच सासरच्या घरी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात हुंडाबळी, मानसिक व शारीरिक छळ तसेच गंभीर गुन्ह्यांचे आरोप समर्थ सिंग आणि इतरांविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. सध्या ते फरार असून तपास यंत्रणांशी सहकार्य करत नसल्याची माहितीही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बार कौन्सिल ऑफ इंडियाने कठोर भूमिका घेत समर्थ सिंग यांचा वकिली परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. या आदेशानुसार ते देशातील कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण किंवा अधिकृत मंचावर वकील म्हणून हजर राहू शकणार नाहीत. ते कोणताही खटला लढवू शकणार नाहीत, युक्तिवाद करू शकणार नाहीत किंवा स्वतःला वकिल म्हणून सादरही करू शकणार नाहीत.

बार कौन्सिल ऑफ इंडियाने आपल्या आदेशात नमूद केले आहे की, हा निर्णय प्रकरणाच्या गंभीर स्वरूपामुळे आणि वकिली व्यवसायाच्या प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी घेण्यात आला आहे. वकील हा न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या वर्तनामुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकून राहणे आवश्यक असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.समर्थ सिंग यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य, पत्नीच्या मृत्यूशी त्यांचा संबंध, गुन्हेगारी तपासातील त्यांची भूमिका आणि सध्या ते फरार असणे या सर्व बाबी लक्षात घेऊन हा अंतरिम निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सुनावणी आणि शिस्तपालन समितीच्या निर्णयानंतर या प्रकरणावर अंतिम भूमिका निश्चित केली जाणार असल्याचेही बार कौन्सिलने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाला नवा वळण मिळाले असून तपास यंत्रणांवरही पुढील कारवाईसाठी दबाव वाढला आहे.