‘वारकरी बालसंस्कार शिबिर’: आचार्यांची नावे जाहीर
पारवा,
‘varkari bal-sanskar shibir’ यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील श्रीदत्त मठ संस्थान (झटाळा फाटा, तरोडा) येथे वैशाख, अधिक ज्येष्ठ शके 1948 (अधिक मास) निमित्त आयोजित ‘अखंड दत्तनाम व अन्नदान सोळस महापूजा’ सोहळा अत्यंत उत्साहात सुरू आहे. हा सोहळा रविवार, 17 मे पासून सुरू झाला असून, रविवार, 14 जून रोजी सांगता होणार आहे. या भव्य धार्मिक महोत्सवाचे मुख्य मार्गदर्शक महंत डॉ. ज्ञानेश्वर भारती महाराज (भारती आश्रम, श्रीक्षेत्र माहूरगड) हे आहेत. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मठाधिपती संत शहापुरी महाराज (गुरुमहंत रमणपुरी महाराज) हे आहेत. या पवित्र सोळस महापूजेचे पौरोहित्य व विधी पूर्ण करण्यासाठी आचार्य आणि सहचार्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये संत शहापुरी महाराज, श्री गजानन महाराज, श्री अंकुश महाराज आणि रोशन महाराज हे मुख्य आचार्य व सहचार्य म्हणून धार्मिक विधी संपन्न करणार आहेत.
‘varkari bal-sanskar shibir’ या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे श्रीतुळजा भवानी आध्यात्मिक वारकरी गुरुकुल (आळंदी देवाची) यांच्या वतीने विशेष ‘वारकरी बालसंस्कार शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, 25 मे पासून सुरू होणार असून, शनिवार, 6 जून रोजी त्याची सांगता होईल. या शिबिराचे संस्थापक गायकाचार्य संजय महाराज शिंदे आणि कीर्तनकार वैष्णवी जाधव आहेत. या बालसंस्कार शिबिरामध्ये लहान मुलांवर उत्तम संस्कार होण्यासाठी वारकरी पद्धतीचे टाळ, गायन, हरिपाठ, भजन, मृदंग आणि वैष्णवी नृत्य (पावल्या) यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाईल. यासोबतच देवभक्ती, देशभक्ती, पितृभक्ती, जीवनमूल्ये, व्यसनमुक्ती आणि संतांचे व थोर पुरुषांचे बौद्धिक व आध्यात्मिक विचार शिकवले जातील. महिनाभराच्या या उत्सवात अखंड दत्तनाम गजर, विधीवत सोळस महापूजा आणि दररोज भाविकांसाठी भव्य महाप्रसाद आयोजित केले आहे. परिसरातील भाविक आणि पालकांनी आपल्या मुलांसह या धार्मिक पर्वणी व संस्कार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्त मठ संस्थान आणि आयोजकांनी केले आहे.