अर्थकारणाला अध्यात्माची जोड; वर्धा अर्बन बँकेची वेगळी वाटचाल

    दिनांक :23-May-2026
Total Views |
प्रफुल्ल व्यास
 
वर्धा, 
Wardha Urban Bank आर्थिक व्यवहार म्हणजे केवळ आकडे, कर्ज आणि ठेवी एवढ्यापुरते मर्यादित नसते, तर त्यातून समाजाशी नाळ जपण्याचे कार्यही घडू शकते, याचे सुंदर उदाहरण म्हणजे बोरगाव (मेघे) येथे मुख्यालय असलेल्या वर्धा अर्बन बँक! आधुनिक बँकिंगसोबत अध्यात्म, संस्कार आणि भक्तीची सांगड घालत या बँकेने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
 
 
bank
 
बँकेच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेले साईबाबांचे मंदिर प्रत्येक ग्राहकाचे लक्ष वेधून घेते. बँकेत प्रवेश करताच भतीमय वातावरणाची अनुभूती येते. दिवसभर बँकेत भक्तीगीतांचा मंद स्वर घुमत असतो. त्यामुळे व्यवहारासाठी आलेल्या ग्राहकांना मानसिक शांतता लाभते आणि बँकेत काम करणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सकारात्मक उर्जा मिळते अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सुधाकर साटोने यांनी दिली. वर्धा अर्बन चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत आम्ही सन १९९४ मध्ये वर्धा अर्बन बँकेची स्थापना केली. २००७ पासुन बँकेत नित्य हरिपाठ, गुरुवारी भजन तसेच कार्तिक आणि आषाढी एकादशीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षीपासुन आषाढीला विठूरायाची पालखी काढून रिंगण सोहळा सुरू केला आहे.
 
 
 
यावर्षीपासुन त्याला मोठे रूप देण्यात येणार असल्याचे साटोणे यांनी सांगितले. बँकेच्या प्रवेशद्वारावर साईबाबांचे मंदिर उभारण्या मागील कल्पना सांगताना साटोणे यांचे डोळे पाणावले. आपण सहकार क्षेत्रातील एका बैठकीसाठी शिर्डी येथे जात असताना कोपरगाव येथे एक भयंकर अपघात झाला. त्या अपघातात शिर्डी येथे दर्शनासाठी जाणार्‍या बापलेकापैकी बापाचा त्यात मृत्यू झाला. त्यावेळी दर्शनाला जाणार्‍या त्या लेकाला बापाचा मृतदेह बघावा लागल्याचे दु:ख मनात सलत होते. त्यामुळे लोकांना तेथे येऊन दर्शनची इच्छा पूर्ण करण्यापेक्षा आपल्याच गावात साई बाबांचे मंदिर उभे करण्याचे ठरवले आणि गावात येऊन संस्थेच्या वतीने बँकेच्या प्रवेशद्वारावरच मंदिर बांधून साईबाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर जवळपास आपण १० वर्षे दर्शनासाठी शिर्डीला गेलो नाही. आजही कितीही महत्त्वाचे काम असले तरी बँकेतील साईबाबांचे दर्शन घेतल्याशिवाय पुढील प्रवास सुरू करत नाही. पुजार्‍यांची मंदिर उघडले नसेल तर पायरीला नतमस्तक होऊन पुढील प्रवासासाठी जात असल्याचे साटोने यांनी सांगितले.
 
 
Wardha Urban Bank  वर्धा अर्बन बँकेने केवळ आर्थिक सेवा पुरविण्यापुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही, तर सामाजिक आणि धार्मिक परंपरांचे जतन करण्यालाही प्राधान्य दिले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने बँकेच्या वतीने दरवर्षी रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. अधिकमासाच्या काळातही बँकेकडून विशेष धार्मिक उपक्रम राबविले जातात. काही भाविकांना तीर्थस्नानासाठी नेण्याची व्यवस्था केली जाते. त्यामुळे आर्थिक संस्थेच्या चौकटीबाहेर जाऊन समाजातील श्रद्धा आणि संस्कार यांना बळ देण्याचे कार्य संस्था करीत आहे. त्याचा आपल्याला आनंद मिळत असल्याचे ते म्हणाले. बँकेच्या जिल्ह्यासह मध्यप्रदेशात शाखा आहे. शेकडोंना नोकरी देल्याचा एक वेगळा आनंद आहे. आधी समाजकारण नंतर राजकरणात या युतीने काम करतो आहे. आपण कृष्णभत आहोत. गोशाळेचीही निर्मिती करण्यात आली असल्याचे सुधाकर साटोने यांनी सांगितले.