देशभरात उभारणार शंभर औद्योगिक पार्क

पीयूष गोयल यांची माहिती, ३३ हजार कोटींची तरतूद

    दिनांक :24-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
Industrial Parks भारत औद्योगिक विकास योजनेंतर्गत देशभरात शंभर औद्योगिक हब (पार्क) उभारले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 33,660 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. ही योजना राज्य सरकारांच्या भागीदारीने राबवली जाईल. यातून देशभरात उत्पादन आणि गुंतवणुकीची केंद्रे निर्माण करण्याची योजना असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
 
piyush goyal
 
Industrial Parks उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि हरयाणा यांसह अनेक राज्यांनी या योजनेसाठी रस दाखवला असल्याची माहिती गोयल यांनी भारत औद्योगिक विकास योजनेच्या मार्गदर्शक सूचना जारी करताना पत्रपरिषदेत दिली. या योजनेअंतर्गत औद्योगिक हबचा विकास टप्प्याटप्प्याने केला जाईल. पहिल्या दोन महिन्यांत 20 अर्ज मागवले जातील. त्यानंतर, पुढील दोन महिन्यांत आणखी 30 साठी अर्ज मागवले जातील, तर उर्वरित 50 साठी पुढील टप्प्यात प्रक्रिया राबवली जाईल. केंद्र सरकार पुढील चार महिन्यांत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून अर्ज स्वीकारेल. सुरुवातीच्या टप्प्यात 50 औद्योगिक हबसाठी प्रस्ताव मिळवून ही योजना देशभरात वेगाने विस्तारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
गुंतवणुकीला चालना
Industrial Parks या योजनेचा उद्देश पूर्व-मंजूर जमीन, आधुनिक पायाभूत सुविधा आणि एकात्मिक सुविधांनी सुसज्ज अशी औद्योगिक परिसंस्था निर्माण करणे आहे, जिथे गुंतवणूकदार कोणत्याही लांबलचक प्रक्रियेशिवाय आपले उद्योग स्थापित करू शकतील. यामुळे कंपन्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल आणि गुंतवणुकीला चालना मिळेल. हे औद्योगिक हब राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाच्या चौकटीत विकसित केले जातील.