मुंबई
Anita Kanwal चार दशकांहून अधिक काळ मनोरंजन क्षेत्रात सक्रिय राहिलेल्या आणि विविध लोकप्रिय मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अनिता कंवल यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 72 वर्षीय अनिता कंवल यांनी अलीकडील मुलाखतीत आपल्याला काम मिळत नसल्याची खंत व्यक्त करताना इंडस्ट्रीतील बदलत्या प्रवाहावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
"परिस्थिती इतकी बिघडते की स्वत:ला संपवावसं वाटतं. तीन दिवसांपूर्वीच मी माझ्या मुलीला म्हणाले, मी कशासाठी जगतेय? मी समाजात किंवा माझ्या कलेसाठी आता काय योगदान देतेय? मी या इंडस्ट्रीला खूप काही दिलं. मी प्रत्येक प्रकारची भूमिका साकारली आहे आणि अनेक पुरस्कार पटकावले आहेत. मग दोष कोणाला द्यायचा - मला की इंडस्ट्रीला", असा सवाल त्यांनी केला आहे.
‘बनेगी अपनी बात’ आणि ‘सोनपरी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून ओळख निर्माण केलेल्या अनिता कंवल यांनी सांगितले की, अनेक वर्षे सातत्याने काम केल्यानंतरही आज त्यांना भूमिकांसाठी संघर्ष करावा लागत आहे. ऑडिशन्स देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. एकेकाळी एकाच वेळी अनेक प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या स्वतःला आज दुर्लक्षित वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
इंडस्ट्रीतील बदलत्या प्रवृत्तीवर भाष्य करताना त्यांनी नव्या पिढीतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना मिळणाऱ्या संधींबाबतही नाराजी व्यक्त केली. अभिनय कौशल्याऐवजी लोकप्रियतेच्या आधारे संधी दिल्या जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांच्या मते, यामुळे पारंपरिक कलाकारांना योग्य स्थान मिळणे कठीण झाले आहे.
मुलाखतीदरम्यान Anita Kanwal त्यांनी भावनिक उद्गार काढत एकटेपणाची आणि उपेक्षेची जाणीव अधोरेखित केली. कामाच्या अभावामुळे आयुष्याच्या उद्देशाबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगताना त्यांनी मानसिक ताणतणावाचा उल्लेखही केला. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की हा क्षणिक भावनिक उद्गार असून त्या जीवनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.अनिता कंवल यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत शाहरुख खानसह अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. विविध प्रकारच्या भूमिका साकारत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. तरीही सध्याच्या काळात मिळणाऱ्या संधींच्या अभावामुळे त्या अस्वस्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, त्यांच्या वक्तव्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांच्या स्थितीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दीर्घ कारकिर्दीनंतर कलाकारांना मिळणारी वागणूक, संधींचे स्वरूप आणि बदलते इंडस्ट्री ट्रेंड यावर विचारमंथन सुरू झाले आहे.