नाशिक
Bhimashankar Temple नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू असलेली विकासकामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, मंदिर १ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार का याकडे राज्यभरातील शिवभक्तांचे लक्ष लागले आहे. विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि पावसाळ्यापूर्वी आवश्यक सुविधा कार्यान्वित कराव्यात, यासाठी प्रशासनाने मंदिर ३१ मे २०२६ पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मंदिर परिसराचा व्यापक विकास आराखडा हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिर परिसरातील सभामंडप, घुमट, पायरी मार्ग, तसेच भाविकांसाठी विविध सुविधा उभारण्याची कामे गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू होती. आता ही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून, प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.आज रविवारी जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग आणि मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांकडून मंदिर परिसराची संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी सुरक्षाव्यवस्था, भाविकांसाठी उपलब्ध सुविधा, पायाभूत कामांची गुणवत्ता आणि गर्दी व्यवस्थापन यांचा आढावा घेतला जाणार आहे. या पाहणीनंतर मंदिर १ जूनपासून सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून निर्णय अपेक्षित आहे.
दरम्यान, भीमाशंकर Bhimashankar Temple देवस्थान ट्रस्टने मंदिर सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सुविधा पूर्ण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान देवस्थानकडून यासंदर्भात लेखी पत्रही सादर करण्यात आले. महाद्वार ते पहिली पायरीपर्यंत संपूर्ण मार्गावर स्टील बॅरिकेटिंग उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दक्षिण बाजूस नव्याने उभारलेल्या पत्र्याच्या शेडपर्यंत सुरक्षित बॅरिकेटिंग करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हनुमान मंदिर ते एक्झिट गेटपर्यंत स्वतंत्र आणि सुरक्षित मार्ग व्यवस्था उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. ऑनलाइन पास व्यवस्थेजवळील जिना पूर्ववत करून पुढील बॅरिकेटिंगची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी अपेक्षा देवस्थानने व्यक्त केली आहे. विकासकामांदरम्यान हटवण्यात आलेले लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सार्वजनिक सूचना प्रणाली पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मंदिर परिसरातील संपूर्ण लाईटिंग पूर्ववत करण्याबरोबरच परिसरात पाणी साचणार नाही यासाठी पीसीसीची कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. पायरी मार्गावरील बॅरिकेटिंगवर मजबूत पत्र्याचे आच्छादन करण्यासह नवीन सभामंडपातील तिन्ही दरवाजांना लॉक व्यवस्था बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. मंदिर सुरू झाल्यानंतर भाविकांच्या सुरक्षेसाठी पूर्वीप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी भूमिकाही देवस्थानने मांडली आहे.
याशिवाय मंदिर सुरू झाल्यानंतर व्हीआयपी प्रोटोकॉलवर मर्यादा आणाव्यात, जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना सुरळीत दर्शन घेता येईल, अशी सूचनाही करण्यात आली आहे. ३१ मे २०२६ पर्यंत सर्व कामे पूर्ण करूनच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात यावे, अशी ठाम भूमिका भीमाशंकर देवस्थान ट्रस्टने घेतली आहे. त्यामुळे प्रशासन आगामी काही दिवसांत कोणता निर्णय घेते, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.