विमानतळावर ४८ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

    दिनांक :24-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
Delhi airport drug bust दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल ४८ कोटी रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. बँकॉकहून आलेल्या दोन थायलंड नागरिकांकडून हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, अलीकडच्या काळातील विमानतळावरील ही सर्वात मोठ्या ड्रग्ज कारवाईंपैकी एक मानली जात आहे.
 

Delhi airport drug bust, IGI Airport drug seizure, Hydroponic weed seized 
दिल्ली विमानतळाचे सीमाशुल्क आयुक्त अरविंद सरन यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज तसेच इतर प्रतिबंधित वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी सीमाशुल्क विभागाकडून चोवीस तास कडक नजर ठेवली जात आहे. सोने तस्करीविरोधातही विशेष मोहिमा राबवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अधिकृत माहितीनुसार,Delhi airport drug bust  हे दोन्ही थायलंड नागरिक २२ मे रोजी बँकॉकहून दिल्लीत आले होते. विमानतळावर ग्रीन चॅनल पार केल्यानंतर संशयाच्या आधारे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले. आधीपासून मिळालेली गुप्त माहिती आणि प्रवाशांच्या हालचालींमधील संशयास्पद बाबी लक्षात घेऊन त्यांच्या सामानाची सखोल तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना सहा व्हॅक्यूम-सीलबंद पॅकेट्स आढळून आले. या पॅकेट्समध्ये हायड्रोपोनिक गांजा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एका प्रवाशाच्या सामानातून सुमारे २९ किलो वजनाचे चार पॅकेट्स जप्त करण्यात आले, तर दुसऱ्या प्रवाशाकडून जवळपास १९ किलो वजनाचे दोन पॅकेट्स सापडले. दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन ४७.८०५ किलो इतके असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.सीमाशुल्क विभागाच्या माहितीनुसार, हायड्रोपोनिक वीड हा गांजाचा अत्यंत प्रभावी आणि उच्च प्रतीचा प्रकार मानला जातो. हा गांजा मातीऐवजी पोषकतत्त्वांनी समृद्ध विशेष पाण्यात पिकवला जातो. कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर आता अमली पदार्थांच्या उत्पादनासाठीही होत असल्याची बाब या कारवाईमुळे पुन्हा समोर आली आहे.या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या मागे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, सीमाशुल्क विभाग आणि इतर तपास यंत्रणा पुढील तपास करत आहेत.