फर्निचर मार्केटला भीषण आग अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक

    दिनांक :24-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
Delhi furniture market fire राजधानी दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये रविवारी उशिरा रात्री भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत शेकडो दुकाने जळून खाक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा पोहोचल्याचा आरोप करत संतप्त स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी मोठा गोंधळ घालत अग्निशमन दलाच्या वाहनावर दगडफेक केली.
 

Delhi furniture market fire, 
मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्री पार्कमधील हे मार्केट मुख्यतः फर्निचर व्यवसायासाठी ओळखले जाते. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकूड, प्लायवुड आणि इतर ज्वलनशील साहित्य साठवलेले असल्याने आग अतिशय वेगाने पसरली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण बाजारपेठेला विळखा घातला आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.आग लागल्याची माहिती मिळताच दुकानदार आणि स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या परीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. दरम्यान, अग्निशमन दलाला तातडीने कळवण्यात आले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या काही लोकांनी हंगामा करत अग्निशमन Delhi furniture market fire  दलाच्या वाहनांवर दगडफेक केली. काही नागरिकांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.या भीषण आगीत सुमारे २५० ते ३०० दुकाने जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेक दुकानदारांचे संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, नोएडामध्येही रविवारी रात्री आणखी एक अग्नितांडवाची घटना घडली. नोएडातील लोटस बुलेवार्ड सोसायटीतील २७ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये एसीचा स्फोट होऊन आग लागली. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली.