- काँग्रेस नेत्याच्या घराजवळ संशयितांचा धुमाकूळ
- पोलिस गस्त आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
गोंदिया,
Deori: Nighttime Security Arrangements देवरी शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील चिचगड रोड परिसरात जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उषा शहारे यांच्या निवासस्थानाजवळ काही संशयित युवकांच्या टोळीचा वावर असल्याचे सीसीटिव्ही कॅमेर्यातून आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्या क्षणीच एका वृद्ध महिलेच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी घटना टळल्याचे बोलले जात असून, या घटनेने शहरातील रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास 9 ते 10 संशयित युवक चिचगड रोड परिसरात फिरताना दिसून आले. परिसरातील नागरिक झोपेत असताना हे युवक संशयास्पद हालचाली करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर काही युवकांनी कथितरीत्या काँग्रेस नेत्या उषा शहारे यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी शेजारी राहणार्या एका वृद्ध महिलेची नजर त्या युवकांवर पडली. परिस्थितीचा अंदाज घेत त्यांनी तत्काळ मोठ्याने आरडा-ओरड केली. अचानक निर्माण झालेल्या गोंधळामुळे संशयित युवकांची भांबेरी उडाली आणि त्यांनी अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विशेष म्हणजे, ही घटना देवरी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर व शहरातील मुख्य मार्ग असलेल्या चिचगड रोड परिसरात घडली.
Deori: Nighttime Security Arrangements त्यामुळे देवरी शहरातील पोलिस गस्त, रात्रीची सुरक्षा व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर अशी घटना घडत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांकडून विविधांगी तपास सुरू असून ही घटना केवळ चोरीच्या उद्देशाने होती की यामागे आणखी काही गंभीर हेतू होता, याचा शोध घेतला जात आहे. परिसरातील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासण्यात येत असून संशयितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेनंतर नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, रात्रीच्या वेळी नियमित आणि कडक पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.