आईलाच जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना

    दिनांक :24-May-2026
Total Views |
धुळे
Dhule crime news लग्न करून देत नसल्याच्या संशयातून एका रिक्षाचालकाने स्वतःच्या वृद्ध आईला ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना धुळे तालुक्यातील महिंदळे गावात घडली. गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जिजाबाई भटू खैरनार-पाटील असे मृत महिलेचे नाव आहे.
 

fht
 
या प्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील (वय ४५) याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी प्रदीपच्या मनात त्याची आईच त्याचे लग्न होऊ देत नसल्याचा संशय होता. याच कारणावरून तो आईबद्दल मनात राग बाळगून होता.जिजाबाई खैरनार या रविवारी रात्री घराच्या अंगणात बसून मुलगा प्रदीपची वाट पाहत होत्या. रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास प्रदीप मद्यधुंद अवस्थेत घरी आला. घरी आल्यानंतर त्याने आईशी वाद घालण्यास सुरुवात केली. “माझे लग्न का करून देत नाहीस?” असा जाब विचारत त्याने आईशी जोरदार वाद घातल्याचे सांगितले जात आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर प्रदीपने आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिल्याचा आरोप आहे.या घटनेत जिजाबाई गंभीररीत्या भाजल्या गेल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
 
 
प्राथमिक तपासात Dhule crime news आरोपी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. तथापि, याबाबत वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा असल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातूनच ही भीषण घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे महिंदळे गावासह परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आई-मुलाच्या नात्यालाच काळिमा फासणाऱ्या या घटनेबद्दल ग्रामस्थांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जिजाबाई या शांत आणि साध्या स्वभावाच्या महिला म्हणून परिसरात परिचित होत्या. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, वाढते कौटुंबिक तणाव, मानसिक अस्थिरता आणि मद्याच्या व्यसनामुळे घडणाऱ्या हिंसक घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.