नवी दिल्ली,
Marco Rubio इराणभोवती वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारत दौऱ्यावर असून त्यांनी नवी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर बोलताना रुबियो यांनी पुढील काही तासांत जगासाठी सकारात्मक घडामोडी समोर येऊ शकतात, असे संकेत दिले. इराणच्या अणुकार्यक्रमासंदर्भातील चर्चा आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावावर तोडगा निघण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना रुबियो यांनी इराणच्या अण्वस्त्र क्षमतेबाबत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चिंतेवर भाष्य केले. सध्या सुरू असलेल्या राजनैतिक हालचालींमुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की, जगाला इराणच्या अणुशस्त्रांची भीती वाटण्याची गरज राहणार नाही, असे त्यांनी म्हटले.

भारत आणि अमेरिकेतील संबंधांविषयी बोलताना रुबियो यांनी भारताला अमेरिकेचा अत्यंत महत्त्वाचा सामरिक भागीदार संबोधले. हे संबंध केवळ औपचारिक राजनैतिक सहकार्यापुरते मर्यादित नसून लोकशाही मूल्ये, सामायिक हितसंबंध आणि जागतिक सुरक्षेच्या प्रश्नांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. Marco Rubio दोन देश जेव्हा समान हितसंबंधांसाठी एकत्रितपणे काम करतात, तेव्हाच खरी सामरिक भागीदारी मजबूत होते, असेही त्यांनी नमूद केले. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापार, ऊर्जा, संरक्षण आणि दुर्मिळ खनिजे यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांत व्यापार आणि शुल्क धोरणांमुळे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.