चार महिलांचा बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद

    दिनांक :24-May-2026
Total Views |
सिंदेवाही, 
Gunjevahi Forest: Tigress Captured तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता वेचण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा बळी घेणार्‍या टी-2 वाघिणीला अखेर वनविभागाने शनिवारी सायंकाळी पवनपार तलाव परिसरात बेशुद्ध करून पिंजर्‍यात जेरबंद केले आहे. आता तिच्या चार बछड्यांचा वनविभाग शोध घेत आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भीतीच्या वातावरण निवळायला सुरूवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला केला होता. या भीषण घटनेत चार महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. एकाच दिवशी एकाच ठिकाणी चार महिला मृत्यूमुखी पडल्याने चंद्रपूर जिल्हा हादरला होता. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत, तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
 
 
waghin
 
घटनेनंतर वनविभागाने संपूर्ण परिसरात मोठी शोधमोहीम सुरू केली. हल्ला करणारा वाघ नेमका कोणता आहे, हे निश्‍चित करण्यासाठी गुंजेवाही जंगल परिसरात तब्बल 20 ट्रॅप कॅमेरे आणि 3 मोशन सेन्सर लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच विशेष पथकाद्वारे दिवस-रात्र गस्त वाढविण्यात आली होती. वनाधिकार्‍यांसह तज्ज्ञ डॉक्टर, ट्रँक्विलायझर चमू आणि बचाव पथक सतत जंगल परिसरात तैनात होते.
 
 
Gunjevahi Forest: Tigress Captured  कॅमेरा ट्रॅप आणि पगमार्कच्या आधारे संबंधित वाघिणीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आल होते. अखेर पवनपार तलावाजवळील जंगल भागात वाघीण दिसल्यानंतर वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध कारवाई करीत तिला डार्ट मारला. काही वेळातच वाघीण बेशुद्ध झाल्यानंतर तिला सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले. वनविभागाच्या या कारवाईनंतर गुंजेवाही आणि परिसरातील गावांमध्ये दिलासा व्यक्त केला असला, तरी तिचे 4 बछडे मोकाटच असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरणायम आहे. जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलन, शेतीची कामे आणि जनावरे चारण्यासाठी जाणार्‍या ग्रामस्थांनी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे. दरम्यान, पकडण्यात आलेली वाघीण हीच हल्लेखोर असल्याची प्राथमिक खात्री वनविभागाने व्यक्त केली असून, पुढील वैद्यकीय तपासणी, डीएनए नमुने आणि कॅमेरा ट्रॅपच्या आधारे अंतिम पडताळणी करण्यात येणार आहे.
 
चारही महिलांची एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा
तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या हल्ल्यात कवडाबाई मोहुर्ले, अनुबाई मोहुर्ले या दोन अविवाहित जुळ्या बहिनींसह सुनिता मोहुर्ले, संगीता चौधरी अशा चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. गुंजेवाही गावात शुक्रवारी सायंकाळी या चारही महिलांचे मृतदेह एकाच वेळी आणण्यात आले. नंतर चारही अंत्ययात्रा एकाच वेळी निघाल्या. स्मशानभूमीतही एकाच वेळी देण्यात आलेला भिडाग्नी पाहून गावकर्‍यांनी हळहळ व्यक्त केली.