रेड अलर्ट जारी! उष्माघाताच्या संशयित मृत्यूंमुळे खळबळ

    दिनांक :24-May-2026
Total Views |
मुंबई
heatwave राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून विदर्भात उष्णतेच्या लाटेने अक्षरशः कहर केला आहे. प्रचंड उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत उष्माघातामुळे झालेल्या संशयित मृत्यूंच्या घटनांनी चिंता अधिकच वाढवली आहे. गेल्या २४ तासांत दोन्ही जिल्ह्यांत मिळून आठ जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
 

heatwave  
यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी उष्णतेची तीव्र लाट जाणवत असताना चार जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यवतमाळ शहरातील दिग्रस परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांचे मृतदेह आढळून आले. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आढळलेल्या मृतांपैकी दोन जणांची ओळख पटली असून उर्वरित मृतांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, बाभूळगाव तालुक्यातील गवंडी गावाजवळ पुलाखाली ६० वर्षीय मारोतराव कोवे यांचा मृतदेह आढळून आला असून प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा मृत्यू तीव्र उष्णतेमुळे झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.नागपूर जिल्ह्यातही उष्णतेचा प्रकोप कायम असून शनिवारी शहरातील तापमान तब्बल ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात दोन आणि ग्रामीण भागातील सावनेर तालुक्यात दोन अशा एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील सक्करदरा आणि यशोधरा नगर परिसरात दोन अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.सावनेर परिसरातही अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून उष्णतेमुळेच या मृत्यूंची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या सर्व मृत्यूंचे नेमके कारण उष्माघात आहे का, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. पोलिस आणि आरोग्य विभागाने या प्रकरणांचा तपास सुरू केला असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, वाढत्या तापमानामुळे heatwave  संपूर्ण विदर्भात जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. भारतीय हवामान विभागाने अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या तीव्र लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुढील काही दिवस परिस्थिती अधिक गंभीर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुपारच्या तीव्र उन्हात घराबाहेर पडणे टाळावे, तसेच शेतातील आणि शारीरिक कष्टाची कामे शक्यतो सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेत करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघातापासून बचावासाठी पुरेसे पाणी पिणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.