मुंबई
Hera Pheri 3 प्रेक्षकांच्या दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या ‘हेरा फेरी’ या सुपरहिट फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. कायदेशीर वाद आणि निर्मितीतील अडचणींमुळे आधीच चर्चेत असलेला ‘हेरा फेरी 3’ आता प्रमुख कलाकारांपैकी एक असलेल्या परेश रावल यांच्या माघारीमुळे पुन्हा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला आहे.
गेल्या वर्षी या चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू असतानाच परेश रावल यांनी अचानक प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे प्रकरण कायदेशीर पातळीवर पोहोचले होते. मात्र काही काळानंतर त्यांनी पुन्हा एकदा बाबूराव ही लोकप्रिय भूमिका साकारण्यासाठी तयारी दर्शवल्याने चाहत्यांमध्ये आशा निर्माण झाली होती. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाला मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.मात्र ताज्या माहितीनुसार, परेश रावल यांनी पुन्हा एकदा ‘हेरा फेरी 3’मधून माघार घेतल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शूटिंग सुरू होण्यापूर्वीच त्यांनी प्रोजेक्ट सोडण्याचा निर्णय घेतला असून आर्थिक अटींवरून नाराजी हे यामागील प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे.‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, परेश रावल यांना या चित्रपटासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचे मानधन निश्चित करण्यात आले होते. Hera Pheri 3 यामधील 11 लाख रुपये साइनिंग अमाऊंट म्हणून त्यांनी आधीच स्वीकारले होते. उर्वरित सुमारे 14.89 कोटी रुपये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्याने देण्याचे ठरले होते. मात्र शूटिंग आणि रिलीजमध्ये होणारा विलंब लक्षात घेता त्यांना मानधन मिळण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार होती, ज्यावर ते असमाधानी असल्याचे सांगितले जात आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर त्यांनी साइनिंग अमाऊंटसह व्याज आणि अतिरिक्त रक्कमही निर्मात्यांना परत केल्याचेही वृत्त आहे. तथापि, या संपूर्ण प्रकरणावर अद्यापपर्यंत ना परेश रावल यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे, ना निर्मात्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
दरम्यान, ‘हेरा फेरी 3’च्या भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून बाबूरावच्या भूमिकेशिवाय चित्रपट पुढे कसा जाणार याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. लोकप्रिय त्रिकुटाच्या पुनर्मिलनाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा नवा धक्का मानला जात आहे.