लग्नाच्या दहा दिवस आधीच नवरदेवाचा दुर्दैवी अंत

    दिनांक :24-May-2026
Total Views |
जळगाव
Jalgaon accident जळगाव जिल्ह्यातील दहिगाव येथे लग्नाच्या अवघ्या दहा दिवस आधी एका २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Jalgaon accident  
योगेश यशवंत पाटील असे मृत तरुणाचे नाव असून ४ जून रोजी त्याचा विवाह होणार होता. मात्र, लग्नाच्या तयारीत असतानाच रोटावेटरच्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हे दहिगाव येथील शेतकरी शोभराज रमेश महाजन यांच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटरचे काम करत होते. कामादरम्यान अचानक तोल जाऊन ते ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली अडकले आणि गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर काही काळ सुरूच राहिल्याने घटनेचे गांभीर्य आणखी वाढले.
 
 
घटनेनंतर तेथे Jalgaon accident उपस्थित असलेल्या एका तरुणाने तत्काळ ट्रॅक्टर बंद करून मदतकार्य सुरू केले. त्यानंतर योगेश यांच्या वडिलांना याबाबत माहिती देण्यात आली. कुटुंबीय आणि नातेवाईक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले आणि शवविच्छेदनानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कुटुंबीय आणि गावावर शोककळा पसरली आहे. ज्या घरातून काही दिवसांत लग्नाची वरात निघणार होती, त्याच घरातून अंत्ययात्रा निघाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण वयात घडलेल्या या अपघातामुळे परिसरातही तीव्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.