आनंदी पालकत्वातून घडतील जबाबदार नागरिक : माधुरी यादवाडकर

    दिनांक :24-May-2026
Total Views |
वासंतिक व्याख्यानमाला २६ चौथे पुष्प उत्साहात
 
वाशीम, 
Madhuri Yadwadkar जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी वृंदाव्दारे आयोजित वाशीम वासंतिक व्याख्यानमाला २६ अंतर्गत पार पडलेल्या चौथ्या पुष्पात पुणे येथील प्रसिद्ध व्याख्यात्या माधुरी यादवाडकर यांनी नव्या काळातील पालकत्वावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि संवादात्मक शैलीत मार्गदर्शन केले. नव्या काळाच्या संदर्भातून आनंदादायी पालकत्व या विषयावरील त्यांच्या व्याख्यानाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्याख्यानाच्या प्रारंभीच त्यांनी, हे केवळ व्याख्यान नसून एक कार्यशाळा म्हणून पाहावे, असे सांगत उपस्थितांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले. पालकत्व ही केवळ मुलांची देखभाल करण्याची प्रक्रिया नसून त्यांना सजग, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडविण्याची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
Madhuri Yadwadkar
 
पालकत्वाचे विविध पैलू उलगडताना त्यांनी प्राणी पक्ष्यांच्या उदाहरणांचा प्रभावी वापर केला. माकडीण आपल्या पिल्लाला सतत कवेत ठेवते. त्यातून अती काळजी घेणार्‍या पालकत्वाचा संदर्भ त्यांनी दिला. कासव अंडी घालून निघून जाते. हे निष्काळजी पालकत्वाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. तर घार आकाशात उंच भरारी घेत असली तरी तिचे बारकाईने पिल्लांकडे लक्ष असते आणि संकटसमयी ती तत्काळ मदतीला धावून येते, हे आदर्श पालकत्व असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी विवेकी, आग्रही, प्रेमळ, काळजीवाहू आणि निष्काळजी अशा पालकत्वाच्या विविध प्रकारांचे लालीमा, कालीमा आणि नीलिमा या उदाहरणांच्या माध्यमातून सविस्तर विश्लेषण केले.
 
 
Madhuri Yadwadkar  नव्या काळातील मुलांसमोरील आव्हानांवर भाष्य करताना त्यांनी माध्यमांचा वाढता प्रभाव, जंक फुडची सवय, खर्चातील बेशिस्तपणा, चुकीची संगत, अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष, बेशिस्त वर्तणूक आणि मानसिक ताण यांसारख्या मुद्यांवर उपस्थितांशी संवाद साधला. मुलांशी वागताना प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, हे स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांची इतरांशी तुलना टाळावी, त्यांना पुरेसा वेळ द्यावा, स्वतःच्या वर्तनातून आदर्श निर्माण करावा आणि मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. मोबाईल वापराबाबत बोलताना त्यांनी वेळेची मर्यादा निश्चित करणे, घरातील नियम स्पष्ट असणे, नियमभंग झाल्यास शिक्षेऐवजी समतोल भरपाईची पद्धत वापरणे आणि मोबाईलचा उपयोग सर्जनशील व नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी करण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच मुलांना पैशांचे व्यवहार हाताळण्याची आणि हिशोब ठेवण्याची सवय लावावी, असेही त्यांनी नमूद केले. योग्य संवाद, योग्य संस्कार आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपली मुले निश्चितच जबाबदार, संवेदनशील आणि सजग नागरिक बनतील, असा विश्वासही माधुरी यादवाडकर यांनी व्यक्त केला. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.