पुणे
NEET paper leak case देशभर गाजत असलेल्या नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात आता नवा आणि गंभीर खुलासा समोर आला असून तपासाला निर्णायक वळण मिळाल्याचे मानले जात आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कोठडीत असलेल्या आरोपी मनीषा हवालदार हिने दिलेल्या जबाबात नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) पॅनलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसारच प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप केला आहे. या दाव्यामुळे परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सीबीआय चौकशीत मनीषा हवालदारने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेपूर्वीच तिने भौतिकशास्त्र विषयातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली होती. ही गोपनीय माहिती तिने मनीषा मांढरे नावाच्या एका महिलेला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवल्याचेही तिने कबूल केल्याचे समजते. या प्रकरणात मनीषा हवालदार, मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या तिघींमध्ये सातत्याने संपर्क असल्याचे तपासात स्पष्ट होत आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या सर्व संशयितांमध्ये पेपरफुटीच्या संदर्भात व्हॉट्सॲपवरून नियमित संवाद होत होता. परीक्षा पूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरे काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा साखळी स्वरूपाचा कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.दरम्यान, NEET paper leak case तपासात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे. सीबीआयला कोणतेही डिजिटल पुरावे मिळू नयेत यासाठी मनीषा हवालदारने आपल्या मोबाईलमधील संशयास्पद चॅट्स आणि डेटा डिलीट केल्याचा आरोप आहे. मात्र सीबीआयचे सायबर तज्ज्ञ डिलीट केलेला डेटा पुनर्प्राप्त करण्याचे प्रयत्न करत आहेत.या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने मनीषा हवालदारच्या निवासस्थानी छापा टाकला होता. या कारवाईत भौतिकशास्त्राशी संबंधित अनेक प्रश्नपत्रिका, लॅपटॉप, मोबाईल फोन तसेच सुमारे ६० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या जप्त केलेल्या साहित्याच्या आधारे तपास अधिक गतीने सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या घडामोडींमुळे संपूर्ण NEET परीक्षेच्या प्रक्रियेवर आणि तिच्या सुरक्षिततेवर गंभीर शंका उपस्थित झाल्या असून तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.