भाच्यांना मामाच्या घरच्या पाहुणचाराची भुरळ

पुरणपोळी आमरसावर भाच्यांची मेजवानी

    दिनांक :24-May-2026
Total Views |
मानोरा,
Manora News तालुक्यातील ग्रामीण भागात आंब्याच्या बहराची लाट ओसरली असली तरी ’आजोळचं प्रेम’ मात्र तसूभरही कमी झालेलं नाही. उन्हाळ्याच्या सुटट्यांमध्ये मामाच्या गावी गेलेल्या भाचे-भाच्यांची ’बच्चे कंपनी’ सध्या पुरणपोळी आणि आमरसावर ताव मारत आहे. घराघरातून हीच वर्दळ ऐकू येत आहे. काळानुसार शेतीचं स्वरूप बदललं, आंब्याच्या बागा तोडून इतर पिकांकडे शेतकरी वळले. मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातही आम्रवृक्षांचं प्रमाण घटलं आहे. पण त्याचा परिणाम आजी आजोबा आणि मामा-मामींच्या मायेच्या ओलाव्यावर झालेला नाही. सुटट्या लागल्या रे लागल्या की, शहरात राहणारी लेक, नातवंड मामाच्या गावी दाखल झाली की मामाच्या घरात सणासारखा उत्साह असतो.
 
 
Manora News
 
पत्रावळींवर गरमागरम पुरणपोळी, पिवळाधमक आमरस, सोबतीला वरणभात, तळले पापड कुरोड्या आणि पाणी. चौकोनी टेबलाभोवती बसलेल्या मुलींच्या चेहर्‍यावरचा आनंद सगळं काही सांगून जातो. एक जण विजयी मुद्रेत ’व्ही’ चिन्ह दाखवतेय, तर दुसरी तृप्तीने पोळीचा घास घेतेय. ग्रामीण भागातील घरांमधील मातीची वास, पत्र्याचं छप्पर आणि साध्या पण मनापासून केलेल्या पाहुणचारामुळे या जेवणाची चव आणखी वाढते. Manora News मामामामींच्या हातची पुरणपोळी आणि झाडावर पिकलेल्या आंब्याचा आमरस ही चव शहरातील हॉटेलमध्ये मिळणं कठीण. पूर्वीच्या काळी आंब्याच्या मोसमात आजोळी जाण म्हणजे पर्वणी होती. आजही ती परंपरा कायम आहे. शाळांना सुटट्या लागल्या की एसटीने, खाजगी वाहनांनी मुलं आजोळी पोहोचतात.
 
 
दिवसभर मित्रांसोबत धमाल आणि दुपारी मामीच्या हातचा गरम जेवणाचा बेत. वाई गौळचे ग्रामस्थ गोपाल महाराज यांच्या मते, आंबे कमी झाले, पण बाजारातून विकत आणून का होईना, मामा आपल्या भाच्यांसाठी आमरसाचा बेत चुकवत नाहीत. लेकीला नातवाला पोटभर खाऊ घालणं म्हणजे आजोळच्या माणसांसाठी अभिमानाची गोष्ट असते. मोबाईल आणि टीव्हीच्या युगात ही दृश्ये मनाला स्पर्श करतात. Manora News प्लास्टिकच्या ताटांऐवजी पत्रावळी, स्टीलच्या ग्लासऐवजी साधे ग्लास आणि त्यातून जाणवणारी मातीची माया. या जेवणातून आजची पिढी ग्रामीण संस्कृती, नातेसंबंधांचं महत्त्व आणि साधेपणातला आनंद शिकत आहे. आंब्याचा हंगाम संपत आला तरी प्रेमाचा हंगाम कधीच संपत नाही, हे मानोरा तालुक्यातील या घरांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. मामाच्या घरची पुरणपोळी आणि आमरस हे फक्त जेवण नाही, तर दोन पिढ्यांना जोडणारा गोडवा आहे.