नवी दिल्ली
Marco Rubio देशाची राजधानी दिल्ली सध्या प्रचंड उकाड्याने अक्षरशः होरपळून निघत आहे. या तीव्र उष्णतेचा फटका आता परदेशी पाहुण्यांनाही बसू लागला असून, भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनीही दिल्लीच्या तापलेल्या वातावरणावर मिश्किल भाष्य केले. त्यांच्या हलक्याफुलक्या टिप्पणीमुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला.
शनिवारी दिल्लीमध्ये नव्या अमेरिकन वाणिज्य दूतावास कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना रुबियो यांनी दिल्लीतील उष्णतेवर विनोदी अंदाजात प्रतिक्रिया दिली. मंचावर येताच त्यांनी हसत म्हटले, “आज येथे येणे माझ्यासाठी खरोखर सन्मानाची गोष्ट आहे. मात्र मी माझे भाषण लहान ठेवणार आहे, कारण येथे खूपच उकाडा आहे. खरंच खूप गरम आहे.”यानंतर त्यांनी आपल्या मूळ शहराचा उल्लेख करत वातावरण आणखी हलकेफुलके केले. “इथे मियामीसारखी दमट हवा नाही. मी मियामीचा असल्याने दमट उकाडा आणि कोरडी प्रखर गर्मी यामधला फरक मला चांगला माहिती आहे,” असे ते म्हणाले. त्यानंतर घड्याळाकडे पाहत त्यांनी विनोदाने विचारले, “आता किती वाजले आहेत? एवढ्या वेळेपर्यंत तरी हवामान थोडे थंड व्हायला हवे होते.”
रुबियो यांच्या या शैलीदार Marco Rubio वक्तव्याने कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्यांच्या विनोदी शैलीचे कौतुक केले आहे.परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर मार्को रुबियो यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास तासभर चाललेल्या या बैठकीत सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान आणि द्विपक्षीय सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. फेब्रुवारी २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर झालेली ही पहिली महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक मानली जात आहे.
दरम्यान, नव्या अमेरिकन वाणिज्य दूतावास कार्यालयाबाबत बोलताना रुबियो यांनी या सुविधेमुळे अमेरिकन नागरिकांचा पैसा वाचणार असून कामकाज अधिक कार्यक्षम होईल, असे सांगितले. हे कार्यालय केवळ व्हिसा प्रक्रियेसाठी नसून अमेरिकेच्या सुरक्षेशी संबंधित अधिकाऱ्यांसाठीही महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.