बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या

    दिनांक :24-May-2026
Total Views |
सुकळीतील मध्यरात्रीचा काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार

उमरखेड, 
Murder of a Bajrang Dal Activist गोवंश तस्करी रोखणाऱ्या एका कट्टर गोरक्षकाची गोवंश तस्करांनी अमानुष आणि अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना येथून 5 किमी अंतरावर सुकळी (ज) येथे शनिवारच्या मध्यरात्री घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गजानन मारोती सुरोशे (वय 32) असे या मृतक बजरंग दल कार्यकर्त्याचे नाव असून या प्रकरणी दोन संशीयतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एमएच29 बीई8915 या बोलेरो पिकअप वाहनातून गोवंशाची अत्यंत निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी उमरखेडच्या दिशेने तस्करी केली जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती.
 
 
Gajanan
 
या माहितीच्या आधारे कार्यकर्त्यांनी बिजोरा टोल नाक्यावर सापळा रचून हे संशयास्पद वाहन अडविण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांच्या दुचाकीला कट मारून, पाडून जखमी करत हुलकावणी देत तस्करांनी वाहन वेगाने पळविले. आपल्या डोळ्यांदेखत गोवंशाची तस्करी होत असल्याचे पाहून गजानन सुरोशे यांनी तातडीने आपल्या एमएच12 पीटी8634 या कारने तस्करांच्या वाहनाचा थरारक पाठलाग सुरू केला. यावेळी तस्करांच्या वाहनाचे टायर फुटले. तरीसुद्धा पकडले जाण्याच्या भीतीने तस्करांनी आपली बोलेरो सुकळी गावाच्या दिशेने वळवली.
 
 
गजानन सुरोशे यांचे वाहन मागोमाग सुकळी गावात शिरताच, आधीच दबा धरून बसलेल्या नराधम तस्करांनी आणि त्यांच्या साथीदारांनी गजानन यांच्या गाडीला वेढा घातला. काही समजण्याच्या आतच तस्करांच्या टोळीने गजानन यांच्या गाडीवर मोठमोठे दगड आणि लाकडी दांडक्यांनी भीषण हल्ला चढवला. या हल्ल्याचे अत्यंत हिंस्र आणि अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. यामध्ये तस्कर किती क्रूर बनले होते हे स्पष्ट दिसत आहे. नराधमांनी गाडीची पूर्ण तोडफोड करून गजानन सुरोशे यांना गाडीबाहेर ओढले. घटनेची माहिती मिळताच पोलिस सहनिरीक्षक विनायक रामोड हे एकटेच घटनास्थळावर पोहचले. त्यावेळी दगडाने अमानुषपणे ठेचल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गजाननला ग्रामस्थांच्या मदतीने तत्काळ उमरखेड शासकीय रुग्णालय व तेथून नांदेड येथे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. घटनेचे गांभीर्य आणि परिसरातील वाढता तणाव पाहता पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी तत्काळ मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळ गाठले.
 
 
सुकळी आणि महागाव परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संवेदनशील भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हत्या करून फरार झालेल्या तस्करांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या नराधम दोषींना पाताळातूनही शोधून काढा आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करा, अन्यथा संपूर्ण जिल्हा पेटून उठेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट आणि आक्रमक इशारा बजरंग दलाने प्रशासनाला दिला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे बोलेरो वाहन उमरखेड तालुक्यातीलच एका कुप्रसिद्ध तस्कराचे असल्याची चर्चा आहे. या गोवंश तस्करीला राजकीय पुढाèयांचे पाठबळ असल्याचा आरोप केल्या जात आहे.
 
 
Murder of a Bajrang Dal Activist  दरम्यान उमरखेड पोलिस ठाण्यात आरोपीला अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमाव जमला. त्यावेळी आमदार किसन वानखेडे, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा व पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी जमावाला आरोपी पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव पांगला. परंतु काही काळ उमरखेडमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मृतकाचा भाऊ ज्ञानेश्वर मारोती सुरोशेच्या तक्रारीवरून मुख्य आरोपी शेख सुलतान शेख अल्लावली व इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींना शोधण्यासाठी हैदराबाद, नांदेड, हिंगोली व परभणी येथे पोलिस पथक रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात यांनी रात्रभरापासून तळ ठोकून घटनेवर लक्ष केन्द्रीत केले असून उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड व ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
गोवंश तस्करीला पोलिसांचे पाठबळ..?
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असल्याचे सर्वश्रुत आहे. ही तस्करी करणारे वाहने अनेक वेळा बजरंग दल व गोरक्षकांनी पकडली. परंतु महामार्ग पोलिस, वाहतूक पोलिस, महागाव, उमरखेड पोलिस यांनी स्वतःहून कधीच या जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. या धंद्यातून मिळणाèया मालिद्यापोटीच पोलिस कारवाई टाळल्या जात असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे.