सा. बां. विभागाच्या दुर्लक्षामुळे भाविकांचा प्रवास जीवघेणा
सायफळ ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
पारवा,
Panganga River Bridge घाटंजी तालुक्यातील सायफळ येथील पैनगंगा नदीवरील पुलाचे कठडे गेल्या 3 वर्षांपासून गायब असल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग किनवटच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथे रोज अपघाताची टांगती तलवार असून, नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप आहे. हा पूल केवळ स्थानिक नागरिकांसाठीच नव्हे, तर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा एक मुख्य दुवा आहे. प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेले उनकेश्वरचे गरम पाण्याचे कुंड, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले माहूरगड आणि चंद्रपूरच्या ऐतिहासिक महाकाली मंदिराकडे जाणाèया हजारो भाविकांची वाहने याच पुलावरून दिवस-रात्र धावत असतात.
Panganga River Bridge मात्र, पुलाला दोन्ही बाजूने सुरक्षिततेसाठी कठडेच नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात तर या पुलावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असते. गेल्या 3 वर्षांपासून ही गंभीर समस्या कायम असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. एखादा मोठा अपघात होऊन कोणाचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, अशी संतप्त विचारणा सायफळचे ग्रामस्थ आणि प्रवासी विचारत आहेत. या ठिकाणी तातडीने नवीन कठडे बसवून पूल सुरक्षित करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.